स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवा…

सौरभ ताम्हणकर व मक्रेश्वर बालगोपाळ:नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली मागणी..

⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील गवंडीवाडा दांडी भागातील व वायरी मोरयाचा धोंडा येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून स्मशानभूमीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळे अंत्यविधीवेळी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, त्यामुळे या दोन्ही स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर व मक्रेश्वर बालगोपाळ मंडळ गवंडीवाडा यांनी मालवण नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालवण गवंडीवाडा दांडी आवार भागातील स्मशानभूमी पूर्वी सुविधा युक्त म्हणून गणली जात होती. परंतु बऱ्याच महीन्यापासून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही स्मशानभूमी विविध समस्यानी ग्रस्त आहे. या स्मशानभूमी मध्ये अंत्यविधीला गेल्यानंतर शवदाहीनीसाठी उभ्या केलेल्या पारई या तुटून पडण्याच्या स्थितीत असल्याने अंत्यविधीच्यावेळी सरणावर लाकडे लावणे शक्य होत नाही. त्यामुळे लाकडे कोसळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरचा गेट गंजून तुटून पडला असून आतील परिसरात चार वाढली असून जंगली झाडेही उगवली आहेत. त्याठिकाणी असणाऱ्या शेडचे काही पत्रेही तुटले आहेत. स्मशानभूमीत अस्वछता तसेच लाईट पेटत नसल्याने काळोखाचे साम्राज्य पसरलेले आहे. नगरपरीषदेने त्याठिकाणी बसविलेला लाईट मीटर बंद आहे. त्यामुळे मोबाईलच्या प्रकाशात अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

तसेच मालवण वायरी येथील मोरयाचा धोंडा येथील स्मशानभूमीच्या शेडचे पत्रे मागील पावसाळ्यात वाऱ्याच्या जोराने तुडून पडले आहेत. त्यामुळे अंत्यविधीवेळी वृद्ध माणसांना बसण्यासाठी गैरसोय होत आहे. तसेच या स्मशानभूमीत सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी विनंती सौरभ ताम्हणकर व मक्रेश्वर बालगोपाळ मंडळ, गवंडीवाडा यांनी निवेदनात केली आहे.

You cannot copy content of this page