मालवणमधील मच्छी मार्केटच्या समस्या तातडीने सोडवा…

सौरभ ताम्हणकर: नगरपालिकेकडे केली मागणी..

⚡मालवण ता.०२-: मालवण शहरातील मच्छी मार्केट परिसराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. मच्छी मार्केट परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता व सोयी सुविधांचा अभाव यामुळे मत्स्य विक्रेत्या महिला, मत्स्य व्यावसायिक व ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी व अस्वछतेमुळे मच्छी मार्केटची व पर्यायाने मालवण शहराची पर्यटकांमध्येही बदनामी होत असून दिवाळी सणामुळे मालवणात पर्यटकांची रेलचेल वाढणार असल्याने या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करावे, अशी मागणी मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालवणचे मच्छीमार्केट हे अत्यंत दुरावस्थेत असून याठिकाणी मच्छी विक्रेत्या महिलांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावून व्यवसाय करावा लागत आहे. मार्केटच्या प्रवेशद्वारावर असलेळ्या पाण्याचा नळामुळे प्रवेशद्वारावरच घाण होत असून हा नळ दुसरीकडे बसविणे गरजेचे आहे. तसेच मच्छिमार्केट मध्ये असलेल्या नळांना पाणी येत नसल्याने पाण्याअभावी स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच मार्केट परिसरात गटाराचे पाणी वाहत असल्याने बरीच दुर्गंधी पसरली आहे, दुर्गंधी व अस्वच्छता दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे सौरभ ताम्हणकर यांनी म्हटले आहे.

तसेच मच्छिमार्केटच्या आतील फ्लोरिंगच्या लाद्या फुटलेल्या अवस्थेत असून त्याठिकाणी चालताना ग्राहक व मत्स्य व्यवसायिकांना इजा होण्याची शक्यता आहे. मच्छी मार्केटमध्ये असलेल्या शौचालयाच्या लाद्या देख तुटलेल्या स्थितीत आहेत, यामुळे मत्स्य व्यावसायिक महिलांना महिलांना त्रास सहन करावा लागत आहे, असेही ताम्हणकर यांनी म्हटले आहे. मच्छिमार्केट मध्ये काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून कोल्ड स्टोरेज बसविण्यात आले होते त्याचा वापर का होत नाही ? ते चालू स्थितीत का नाही ? मच्छिमार्केटच्या वरील पहिला मजला हा नेमका कशा करिता आहे. त्याठिकाणी असलेले गाळे/दुकाने हे बंद का आहेत ? असे सवालही ताम्हणकर यांनी उपस्थित करत यावर नगरपालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. मच्छी मार्केटच्या समस्या लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन नगरपालिका प्रशासनाने श्री ताम्हणकर यांना दिले आहे.

You cannot copy content of this page