शारीरिक शिक्षण शिक्षकांवरील अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलन…

अजय शिंदे;राज्यात बीपीएड अर्हताधारक शिक्षकांच्या रिक्त पदांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात भरणे आहे..

⚡मालवण ता.२८-: शिक्षक भरती पोर्टलमध्ये केवळ शारीरिक शिक्षण विषयाचा पूर्ण कार्यभार असला, तरच त्या विषयाचे पद शिक्षक भरतीसाठी पात्र आहे, अशी अट घातली गेली आहे. ही अट अत्यंत क्लेशदायक आहे. बीपीएड अर्हता प्राप्त बेरोजगार युवकांवर हा मोठा अन्याय आहे. हा अन्याय दूर करून शिक्षकांप्रमाणेच बीपीएड अर्हता प्राप्त उमेदवारांना शालेयस्तरावर १४ मे १९८७ च्या अर्हता समकक्षता जीआरप्रमाणे सुधारित शासनस्तरावरून निर्गमित कराव्यात, अशी मागणी राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ करीत आहे. बीपीएड शिक्षकांवरील हा अन्याय दूर न झाल्यास शिक्षक भरती पोर्टल विरोधात तीव्र आंदोलन व न्यायालयीन लढाईशिवाय पर्याय राहणार नाही, अशा आशयाचे निवेदन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे.

पवित्र पोर्टलद्वारा शिक्षक भरती प्रक्रियेत शारीरिक शिक्षण विषय अर्हता प्राप्त शिक्षक मागणीसंदर्भात जाहिरात देण्याबाबतच्या परिपत्रकात चुकीच्या व बेकायदेशीर सूचना दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये केवळ शारीरिक शिक्षण या विषयाच्या पूर्ण कार्यभाराची अट घातली गेलेली आहे. या विषयाची पद्धत घेतलेल्या बीपीएड अर्हता प्राप्त शिक्षकांवर हा अन्याय होणार आहे. प्रत्यक्षात बीपीएड ही अर्हता बीएड अर्हतेला समकक्ष आहे. शासनाचा तसा अध्यादेश आहे. अनेक कोर्ट केसीसमध्ये यावर निकालही दिलेले आहेत. बीपीएड व बीएड या दोन्ही अर्हतेमध्ये दोन पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. या दोन्ही अर्हतेसाठी बीए / बीकॉम / बीएस्सी ही पदवी अनिवार्य आहे. बीपीएड ही अर्हता ५० वर्षापूर्वीप्रमाणे केवळ शारीरिक शिक्षण विषयापुरती मर्यादित न राहता ही बीएडप्रमाणेच बायफोकल अर्हता शासन मान्यता प्राप्त आहे. हे सर्व शासनास अभिप्रेत असताना बीपीएड ही अर्हता केवळ शारीरिक शिक्षण विषयापुरती मर्यादित समजून शिक्षण संस्थांना शिक्षक मागणी जाहिरातीसाठी दिलेली सूचना बीपीएड अर्हता प्राप्त सर्व उमेदवारांवर अन्याय करणारी आहे, असे महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षक शिक्षण महासंघाने दिलेल्या निवेदनात अजय शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्यात बीपीएड अर्हताधारक शिक्षकांच्या रिक्त पदांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात भरणे बाकी आहे. हजारोंच्या संख्येने बीपीएड अर्हता प्राप्त बेरोजगार उमेदवार गेल्या १३ वर्षांपासून शासनाकडून ही पदे भरण्याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु केवळ याच विषयाबाबत शिक्षण विभाग सतत उदासिन असल्याने या विषयाशी निगडीत सर्व स्तरावर नाराजी आहे. या विषयाचे राष्ट्रीयस्तरावरील महत्व, अभ्यासक्रमातील आधुनिकता, त्याची क्रीडा क्षेत्राशी असलेली उपयोगिता, आंतरराष्ट्रीय खेळाडू व आदर्श नागरिक निर्मितीसाठीचा पाया याबरोबरच शालेयस्तरावर विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी या विषयाची गरज लक्षात घेता, त्याला अधिक महत्व देणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञांचे आहे. बीएडप्रमाणे बीपीएड अर्हता प्राप्त शिक्षक हा आर्ट, कला किंवा विज्ञान विषयाचा पदवीधर असतो. बीएडप्रमाणेच दोन विषयांचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेले असते. बीपीएड पदवीधर हा बीएडप्रमाणे शालेयस्तरावर दोन विषय अध्यापनासाठी पात्र आहे. याचा विचार करून शासनाने १९८६ मध्ये विधान परिषद सभागृहात समिती स्थापन करून या समितीच्या शिफारशीनुसार बीपीएड अर्हता ही बीएड अर्हतेशी समकक्ष समजली गेलीय, असेही अजय शिंदे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page