⚡कणकवली ता.२७-: रिक्षा चालकांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी २८ ऑक्टोंबर २०२३ रोजी ठीक १०:३० रत्नागिरीत आयोजित चर्चा सत्रात जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष भि.नाईक , कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ सहसचिव सुधिर पराडकर
यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड, जिल्ह्यांमधे येणाऱ्या काळात मुक्त रिक्षा परवाना वाटपासह दुचाकी टॅक्सी परवाना तसेच ई रिक्षा विना परमिट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. तसेच शासनाने बदललेल्या धोरणामुळे रिक्षा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. तसेच आपल्या कुटुंबाच्या उपजिविकेसह मुलांचे शिक्षण वैद्यकीय खर्च व इतर खर्च करते वेळी शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्राच्या काही भागात रिक्षा व्यावसाय ठप्प झाल्याने कर्जबाजारी होवून काही रिक्षाचालकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. यामधे काही रिक्षाचालक मृत्युमुखी देखील पडले आहेत. परिवहन विभाग व पोलिस प्रशासन यांच्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण होत चालले आहे.
तरी आपण या जुलूमशाही विरोधात जन आंदोलन करुन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी २८ ऑक्टोंबर २०२३ रोजी ठीक १०:३० रत्नागिरीत आयोजित चर्चा सत्रात जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिक्षा चालक मालक कृती समिती पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालकाचे प्रतिनिधि उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरुख, संगमेश्वर, लांजा, राजापूर सह रत्नागिरीतील रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. माहितीसाठी प्रताप भाटकर ९७६५३९८९९८ यांच्याशी संपर्क साधावा.
