मुख्याधिकाऱ्यांनी रॉक गार्डन मध्येही एखादा इव्हेंट आयोजित करावा…

महेश कांदळगावकर:गार्डनची दुर्दशा व पर्यटकांची नाराजी दोन्ही अनुभवता येईल..

मालवण (प्रतिनिधी)

मालवण नगरपालिकेचे रॉकगार्डन हे दिवसेंदिवस पर्यटकांच्या पसंतीस उतरत असून लाखो पर्यटक गार्डनला भेट देत आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सध्या रॉक गार्डन मध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. लाखो रुपये खर्चून गार्डन मध्ये बसविलेला म्युझिकल फाउंटन बंद असून गार्डनमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले आहे, याबाबत पर्यटकांकडूनही नाराजी व्यक्त होत असून मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी रॉक गार्डन मध्येही एखादा इव्हेंट आयोजित करावा, म्हणजे त्यांना गार्डनची दुर्दशा व पर्यटकांची नाराजी दोन्ही अनुभवता येईल, अशी जोरदार टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

मालवण नगरपालिकेच्या रॉक गार्डनच्या सौदंर्यात भर पडावी म्हणून आमच्या कालावधित सुमारे ९५ लाखाचा म्युझिकल फाऊन्टन गार्डनमध्ये बसविण्यात आला. फाऊन्टन बसविल्या नंतर पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली. पर्यायाने रॉक गार्डन परिसरातील व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ झाली. परंतु सध्या पर्यटन हंगाम सुरु होवूनही हा म्युझिकल फाऊन्टन बंद आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. तसेच रॉक गार्डनमध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. ज्या ठिकाणी मुलांना खेळण्या साठी खेळणी बसवली आहे त्या ठिकाणच्या लाईट बंद आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टॉयलेटमध्येही लाईट नाही. त्याचप्रमाणे रॉक गार्डन मध्ये शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करुन ‘आय लव्ह मालवण’ हा सेल्फी पॉईंट वर्षाभरापूर्वी बसविण्यात आला आहे. रात्रीच्या लाईट मध्ये हा सेल्फी पॉईंट आकर्षक असल्याने गार्डनच्या सौंदर्यात भर पडून पर्यटकांनाही त्याठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह होतो. मात्र सध्या या सेल्फी पॉईंटच्या सर्व फ्लड लाईट बंद असल्याने हा सेल्फी पॉईंट काळोखात आहे, असेही महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

रॉक गार्डन मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडून नाममात्र पाच रुपये प्रवेश फी घेण्यात येत होती. यापासून नगरपरिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पण सध्या प्रवेश फी पण वसूल केली जात नाही. ऑक्टोबर मध्ये सलग सुट्या मध्ये हजारो पर्यटक मालवण मध्ये येऊन गेले आहेत. मात्र प्रवेश फी काऊन्टर बंद असल्याने रॉक गार्डनला भेट दिलेल्या पर्यटकाकडून मिळणारे प्रवेश फी चे नरपरिषदेचे उत्पन्न बुडले आहे याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल महेश कांदळगावकर यांनी उपस्थित केला आहे.

रॉक गार्डनच्या जडणघडणीत प्रत्येक लोकप्रतिनिधिनी आपापल्या काळात प्रयत्न करून अल्पावधित गार्डन पर्यटन दृष्टया सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सध्या नगरपालिका प्रशासनाच्या अक्ष्यम्य दुर्लक्षा मुळे गार्डनमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून पर्यटकही नाराज होत आहेत. याचा परिणाम रॉक गार्डनच्या लोकप्रियतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page