सावंतवाडीतील पुनरावृत्ती बांदा शहरात होऊ नये यासाठी शहरातील वीज वाहिन्यांवर धोकादायक झाडे तात्काळ तोडा…

रियाज खान: बांदा उपसरपंच जावेद खतीब यांच्याकडे निवेदनद्वारे केली मागणी…

⚡बांदा ता.१२-: सावंतवाडी शहरात वीज वाहिन्यांवर झाड कोसळून दोन युवक मयत झाल्याची घटना घडली. या घटनेची पुनरावृत्ती बांदा शहरात होऊ नये यासाठी शहरातील वीज वाहिन्यांवर असलेली धोकादायक झाडे तात्काळ तोडण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बांदा उपसरपंच जावेद खतीब यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहरात वर्दळीच्या अनेक ठिकाणी धोकादायक झाडे असून ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या झाडांना लागूनच महावितरणची वीज वाहक लाईन जात असल्याने झाड कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गणेश चतुर्थी कालावधीत सावंतवाडी शहरात झाड कोसळून वीज वाहक तारांचा स्पर्श झाल्याने दोघे तरुण ठार झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर भविष्यात बांदा शहरात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या झाडांची तोड करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
शहरात ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने सर्वे करून अशा धोकादायक झाडांची यादी बनवून त्यांची तोड करावी. शहराचा सर्वे करताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील सोबत घ्यावे. पाऊस संपल्याने तात्काळ व गांभीर्याने यावर उपाययोजना करण्यात यावी असेही शेवटी म्हटले आहे.
यावेळी रियाज खान, पप्या सावंत, मुख्तार शेख, श्रीकांत धोत्रे, सागर धोत्रे, अक्षर खान, दिगंबर आईर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page