मंत्री दीपक केसरकर:ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा मिळणार …
⚡सावंतवाडी ता.१०-: येथील पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी १४ कोटी ५० लाख रूपये इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
तर नव्या इमारतीमुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा मिळणार असून प्रशासकीय मान्यतेसाठी सहकार्य राहीलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभारी असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.
श्री केसरकर यांनी ऑनलाइन पद्धतीने आज पत्रकारांची संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सावंतवाडी पंचायत समितीची सालईवाडा येथे असलेली इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने त्या जागी नवीन प्रशस्त इमारत व्हावी असा प्रयत्न गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सुरू होता. सुरुवातीच्या काळात सावंतवाडी शहरातील भटवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेत इमारत होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावेळी नूतन इमारतीसाठी २ कोटी १५ लाख रुपये मंजुरीही प्राप्त झाली होती. मात्र, त्याला मूर्त रूप मिळू शकले नव्हते.
मध्यंतरीच्या काळात सालईवाडा येथील इमारत अतिशय जीर्ण व धोकादायक झाल्याने ४ वर्षांपूर्वी सदरची इमारतीमधील पंचायत समितीचा कारभार शिरोडा नाका येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आला होता.
त्यानंतर २ कोटी १५ लाख रुपये मंजुरीचा प्रस्ताव रद्द करत सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठीचा नवा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. सदरचा प्रस्ताव हा सालईवाडा येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या जागेवर करण्यात आला होता. आज अखेर या अंदाजपत्रकाला शासकीय मान्यता मिळाली असून सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या १४ कोटी ५० लाख रूपये इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
त्यामुळे तब्बल १५ वर्षांहून अधिक काळ पंचायत समितीच्या इमारतीसाठी सुरु असलेला वनवास आता संपणार आहे. नव्या प्लॅननुसार सदरची इमारतही जी प्लस फोर असणार आहे यामध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कार्यालय असणार असून प्रशस्त हॉल प्रसाधनगृह तसेच सभापती उपसभापती गटविकास अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र दालन व अन्य सोयी सुविधा ही असणार आहे.
