Headlines

आमच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा जनतेला प्रश्न विचारावेत…

गुरुनाथ खोत :राज्यात आणि देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम सुरूच राहणार….

मालवण (प्रतिनिधी)

आज देश वाईट परिस्थितीतून वाटचाल करत आहे, देशात हुकूमशाही सुरु आहे. मात्र ही हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही, म्हणूनच आम्ही जनतेत जाऊन प्रश्नांवर चर्चा करत आहोत, भाजप वाल्यानी आमच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा जनतेला प्रश्न विचारावेत, राज्यात आणि देशात परिवर्तन होत नाही तो पर्यंत होऊ द्या चर्चा कार्यक्रम सुरूच राहणार, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुनाथ खोत यांनी येथे बोलताना केले.

भाजपच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मालवणात आयोजित होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम आज सायंकाळी उशिरा फोवकांडा पिंपळपार येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते गुरुनाथ खोत, आमदार वैभव नाईक, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी, भाई कासवकर, पूनम चव्हाण, रश्मी परुळेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, अपुऱ्या आरोग्य सुविधा, बेरोजगारी, महागाई, विकास कामांना स्थगिती, डिझेल परतावा, बंधाऱ्यांची कामे आदी अनेक प्रश्नांवर आज चर्चा होणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही लोकांमध्ये जात आहोत. मालवणात नौदल कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी पंतप्रधान येणार आहेत, त्यापूर्वी आम्हाला भाजप वाल्याना प्रश्न विचारायचे आहेत. आज तुम्ही शिवरायांचा पुतळा उभारत आहात, मात्र सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दहा कोटी मंजूर असलेल्या कामाला स्थगिती दिली, ती स्थगिती कधी उठविणार यावर आम्हाला चर्चा करायची आहे. भाजपवाले जे जे प्रश्न विचारतील त्याला मी उत्तरे देणार, मी पळून जाणार नाही, इतर आमदार ईडी च्या कारवाईला घाबरून भाजपात गेले, तसा मी भाजप मध्ये गेलो नाही, मी पन्नास कोटी घेऊन कुठे लपलो नाही, मीं जनतेतच आहे, भाजपने आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असेही आम. नाईक म्हणाले.

जनतेने येत्या निवडणुकीत डोळ्यात तेल घालून सर्व पाहायचे आहे, भाजपवाले पुन्हा मते मागायला येतील, मात्र नऊ वर्षे कसे फसवले हे लक्षात ठेवून पुढे आपण फसणार नाही याची दक्षता जनतेने घ्यावी, असे प्रदीप बोरकर म्हणाले. देशात गेली नऊ वर्षे तीच भाषणे तीच आश्वासने ऐकायला मिळत आहेत, त्यामुळे जनतेसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांवर आज सुरु झालेली ही चर्चा निवडणूक होई पर्यंत सुरु राहिली पाहिजे, असे नितीन वाळके म्हणाले. तर हरी खोबरेकर यांनी होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम यापुढेही सुरु ठेवून भाजप वाल्याना नंगे केल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक इशारा दिला. पूनम चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महेश जावकर, सन्मेष परब, सेजल परब, मंदार ओरसकर, यतीन खोत, तृप्ती मयेकर, तपस्वी मयेकर, अंजना सामंत, नंदा सारंग, शिला गिरकर, नरेश हुले, महेंद्र म्हाडगुत, अमेय देसाई आदी व इतर कार्यकर्ते, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page