जिल्ह्यातील शेतकरी, बागायदाराना होणार फायदा:आ नितेश राणे यांची माहिती
ओरोस ता.२७-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना योग्य मोबदल्या अभावी होणारे नुकसान आता थांबणार आहे. नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न समितीच्या मार्केट यार्डला पर्याय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य शासनाने मार्केट यार्ड मंजूर केले आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील रेल्वे स्टेशन नजीक येथे हे यार्ड प्रस्तावित करण्यात आले असून पुढील कार्यवाही जिल्हाधिकारी व जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक यांच्या मार्फत सुरू असल्याची माहिती आ नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे यांच्या समवेत आ राणे यांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी दालनात बैठक घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे यांच्यासह अन्य उपस्थित होते. या बैठकीनंतर आ राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
