पाच दिवसांच्या बाप्पाना भक्तीपूर्ण वातावरणात निरोप…

⚡सावंतवाडी ता.२३-: बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला…चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात पाच दिवसांच्या बाप्पाना निरोप देण्यात आला.

कोकणचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थीला 19 सप्टेंबर पासून सुरुवात झाली. यावर्षी गणेशोत्सव अगदी धुमधडक्यात साजरा करण्यात आला. कोकणात दीड, पाच, सात, अकरा, अठरा, एकवीस अशा पद्धतीने गणपती विसर्जन करण्यात येते. या दिवसात गणेश भक्त मनोभावे आपल्या बाप्पाची सेवा करत असतो. या कालावधीत आरती, भजन, महिलांच्या फुगड्या, खेळून गणेश भक्त हा महाउत्सव साजरा करत असतात. या गणेशोत्सवा निमित्ताने घराघरात नातेवाईक, मित्रमंडळीची गाठभेट होते. लहान थोर मंडळींसह सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते. गेले दोन दिन दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पाच दिवसाच्या गणपती विसर्जनालाही पावसाचे सावट होते. जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळल्याने गणेश भक्तांसह चाकरमान्यांच्या आंनदावर विरजण पडल्याचे दिसत होते. दुपार पासूनच घरोघर आरती सुरु झाल्या आणि त्यानंतर बाप्पाना निरोप देण्याची तयारी सुरु झाली. गेले तीन चार दिवस जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. मात्र, त्याच जल्लोषात, उत्साहात गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोषा, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, आणि पारंपारिक वाद्यांच्या सहाय्याने सुरु असलेल्या आरतीने विसर्जन मिरवणूक सुरु झाली. फटाक्यांच्या आतषबाजीत, महिलांच्या फुगडी, तर आरतीच्या ठोक्यावर वाजत गाजत मूर्ती किनाऱ्यावर नेण्यात आल्या. नदी, नाले, समुद्र या गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली केली होती. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ, तसेच महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. दीड, पाच दिवस गणपतीची सेवा चाकरी केल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. कोकण रेल्वे, खासगी बसेस, एसटी महामंडळ, फुल झाल्या आहेत. एसटी, रेल्वेने जादा गड्या सोडल्याने चाकरमान्याना काहीसा दिलासा मिळाला आहे. या गणेशोत्सवात विज वितरणने महत्वाची भूमिका बजावली. एरवी वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा चतुर्थी कालावधीत सुरळीत ठेवण्यात विज वितरणला यश आले. यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले होते. अनेकजण खासगी वाहनांनी आले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेसह सुरक्षा व्यवस्थेचा मोठा ताण पोलिसांवर होता. आपल्या घरच्या बाप्पाची सेवा करताना जनतेलाही सेवा देण्यात पोलीस आणि त्यांच्या मदतीला असणाऱ्या होमागार्डने महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा झाला.

You cannot copy content of this page