माजी नगराध्यक्ष आफरिन करोल यांनी केला होता पाठपुरावा:नागरिकांतून समाधान
कुडाळ, प्रतिनिधी
कुडाळ मस्जिद मोहल्ला येथील नागरिकांच्या घरावरून गेलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे तेथील नागरिकांना घरांची डागडुजी तसेच दुरुस्ती करणे अशक्य होत होते. त्याचप्रमाणे पावसाच्या दिवसात या विजेच्या तारा नागरिकांच्या घरावर पडून जीवितहानी तसेच वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी याबाबत पाठपुरावा करत कुडाळ येथील महावितरण अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे सदरचे धोकादायक पोल आणि विद्युत वाहिन्या स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने जिल्हा नियोजनमधून सदरच्या वीजवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी १ लाख ९२ हजार इतका निधी उपलब्ध झाला. त्यानुसार नागरिकांच्या घरावरील या धोकादायक वीजवाहिन्या नवीन विजेचे पोल घालून आफरीन करोल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे स्थलांतरित करण्यात आल्या. त्याचप्रमाणे, मागील कित्येक वर्ष धोकादायक आणि जीर्ण ट्रान्सफार्मर मस्जिद मोहल्ला रेल्वेस्टेशन येथे होता. याबाबत आफरीन करोल माजी नगराध्यक्ष कुडाळ यांनी सततचा पाठपुरावा करून हा जीर्ण झालेला ट्रान्सफॉर्मर बदलून घेतला. त्यामुळे तेथील आजूबाजूच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मस्जिद मोहल्ला रेल्वेस्टेशन माजी नगराध्यक्षा कुडाळ येथील नागरिकांनी आफरीन करोल यांचे आभार मानले.
