⚡मालवण ता.१५-: बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखरेपर्यंत जात पडताळणीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावेत व आक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जात पडताळणीचे ऑफलाईन प्रस्ताव जात पडताळणी समिती सिंधुदुर्ग येथे सादर करावेत, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना पडीयार यांनी मालवण शहरातील टोपीवाला ज्युनियर कॉलेज व भंडारी ज्युनियर कॉलेज येथे सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिराप्रसंगी आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.
यावेळी जिल्हा जात पडताळणी समिती सिंधुदुर्गचे व्यवस्थापक संतोष कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित गंगावणे, भंडारी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एच. बी. तिवले, संग्राम कासले, स्नेहल पराडकर, प्रा. पवन बांदेकर, टोपीवाला ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तप्रसाद खानोलकर तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
जात पडताळणी समिती सिंधुदुर्गचे व्यवस्थापक संतोष कदम म्हणाले, सहज सुलभ जात पडताळणी करता यावी, यासाठी शासनाने सोय केली आहे. विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी आवश्यक असणारे मुळ पुरावे स्कॅन करून घ्यावेत. त्यानंतर बार्टीच्या संकेतस्थळावर अकाऊंट सुरू करून मूळ पुरावे अपलोड करावेत. या प्रक्रियेवेळी ऑनलाईन पद्धतीने १०० रूपयांचे शुल्क घेतले जाते. जात पडताळणीची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचा ईमेल आयडी द्यावा. त्रयस्थ व्यक्तीचा ईमेल आयडी देऊ नये. कारण विद्यार्थ्यांना त्याच ईमेल आयडीवर जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, त्याच जिल्ह्यातून जात पडताळणीचा अर्ज करावा.
मानवी दिनांकाचा पुरावा महत्वाचा
समितीच्या अध्यक्ष ज्योत्स्ना पडीयार म्हणाल्या, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मानवी दिनांकाचा पुरावा असणे महत्वाचे आहे. अनुसुचित जातीसाठी १० ऑगस्ट १९५०, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचा पुरावा असणे आवश्यक आहे. मानवी दिनांकापूर्वीच्या जात नोंदणीना सर्वाधिक महत्व आहे. तसेच मानवी दिनांकापूर्वीचा कुटुंबाचा महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. हमीपत्र अर्ज विहित मुदतीनंतर उशिरा सादर केल्यास समितीला हमीपत्र द्यावे लागते.
