⚡मालवण ता.०९-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीच्या ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेच्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल व जलसुरक्षा विषयांतर्गत जलसिंचनाचा अभ्यास व निरीक्षण करण्याच्या दृष्टीने नुकतेच क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. ओझर विद्यामंदिरचे विद्यार्थी दोडामार्ग तालुक्यातील तिलारी प्रकल्प येथे गेले होते. वाटेत क्षेत्रभेटीत सहभागी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तिलारी येथील मुख्य धरण व त्याच्या बाजूलाच असलेले लहान धरण, वीज निर्मिती प्रकल्प येथे विद्यार्थ्यांनी भेट देऊन निरीक्षण केले. वीज निर्मिती प्रकल्पात अधिकाऱ्यांना मुलांनी प्रश्नही विचारले. या क्षेत्रभेटीमुळे भूगोल व जलसुरक्षा विषयाचे ज्ञान वाढण्यास मदत झाली. प्रत्यक्ष अध्ययन अनुभव प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थी आनंदात होते. परतीच्या प्रवासात विद्यार्थ्यांनी सावंतवाडी येथील मोती तलावाचे निरीक्षण केले. त्याच्या निर्मितीचा हेतू व महत्व जाणून घेतले. या भेटीचे आयोजन मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी केले. शिक्षक अभय शेर्लेकर, शिवराम सावंत, प्रवीण पारकर व श्रीमती बांदिवडेकर हे यात सहभागी झाले होते.