मालवण (प्रतिनिधी)
केंद्रशासनाच्या वतीने आयोजित इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपरिषदेने सहभाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी मालवण नगरपरिषदेने ‘मालवण नेव्हीगेटर्स’ या नावाने संघाची नोंदणी केली असून या संघांचे संघनायक म्हणून लेफ्टनंट प्रा. डॉ. एम आर. खोत यांची तर अभियानाचे ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून हॉटेल व्यावसायिक संजय गावडे, डॉ. राहुल वालावलकर, पत्रकार महेंद्र पराडकर, कवी रुजारिओ पिंटो, पर्यावरण कार्यकर्ता कु. मेगल डिसोजा व सल्लगार म्हणून प्रा. खोबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नियुक्तीपत्र देऊन याबाबत घोषणा केली.
कचरा मुक्त शहर ही संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी आणि स्वच्छते बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Housing & Urban Affairs) स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी देशातील सर्व शहरांमध्ये इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील सर्व शहरे आपल्या नागरिकांच्या संघासह उतरणार असून मालवण नगरपरिषदेने ‘मालवण नेव्हीगेटर्स’ या नावाने संघाची नोंदणी केली आहे. इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत दि. १७ सप्टेंबर रोजी मालवण शहरातील बंदर जेटी येथे सकाळी ७ वाजता किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसेच शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. या कारणांनी मालवण शहर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून नावारूपास येत आहे. आपल्या शहराची पर्यटकांना भुरळ घालणारी निसर्ग समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी व शहर स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व मालवणचे देशपातळीवर नावलौकिक होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.