मराठा समाजाने संयम बाळगत महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा

प्रभाकर सावंत:दोषींवर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच कडक कारवाई करतील...

⚡ओरोस ता.०३-: जालन्यातील दुर्दैवी घटनेबद्दल मी तातडीने प्रतिक्रिया देण टाळले. कारण मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीतील मी एक जबाबदार घटक आहे. तसेच त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून मी पाहत नाही. मी स्वतः अनेक मराठा मान्यवरांसह सकल मराठा समाज मोर्चासाठी तळमळीने सामील झालो असलेने मला त्या प्रश्नांची जाण आहे. झालेली घटना जिव्हारी लागणारी आहे.

कालच्या घटनेत महिला पोलिसांवर दगड फेक करणारा हा छत्रपती महाराजांचा मराठा मावळा असूच शकत नाही.त्यामुळे ज्या विघातक प्रवृत्तीनी दगडफेक केली त्या उपद्रवी लोकांचा मी निषेधच करतो. परंतु मराठा समाजाने संयम बाळगत महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा, असे आवाहन मराठा नेते तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मराठा समाजाला केले आहे.

या प्रकरणातील दोषींवर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच कडक कारवाई करतील. पण या प्रकरणातून विरोधक केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाची ढाल करत यावर राजकारण करणाऱ्यांची मराठा समाज नोंद घेईल. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे प्रयत्न केले आणि या विषयाला मूर्त रुप दिलेही. मराठा आरक्षणात कायदेशीर लढणाऱ्या सर्वांना एकत्र करत फडणवीस यांनी हा विषय पुढे नेला. आरक्षण मिळवले आणि टिकवूनही दाखविले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा लढा कायदेशीर प्रकरणात अडकल्याने यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आजवर मराठा समाजाने हा लढा अतिशय संयतपणे आणि संयमाने लढलेला आहे. त्यामुळे आरक्षण मिळवून देण्याचा फडणवीस यांचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे.
भाजपा चा जिल्हाध्यक्ष आणी एक मराठा कार्यकर्ता म्हणून माझी तमाम मराठा समाजातील माझ्या बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. आजवर आपण शिस्तबद्ध आंदोलनं आणि मोर्च्यांतुन जगाला आदर्श घालून दिला आहे, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. त्याला मिळालेलं चुकीचं वळण त्या प्रतीमेला तडा जाणारं ठरेल. ते समाजाच्या प्रतिमेला परवडणार नाही. तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही. ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. भाजपाने कधीही तोडफोडीच, भुलथापांचं राजकारण केलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण नक्कीच मिळवून देतील याची खात्री बाळगा, असे आवाहन करतानाच सावंत यांनी मराठ्यांचा महायुती सरकारवर विश्वास आहे. युतीचेच नेते सकारात्मक आहेत हे लवकरच स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

You cannot copy content of this page