स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.३१-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये प्रेमाचे व आपुलकीचे पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. या सणाचे औचित्य साधून इयत्ता ४ थी च्या विद्यार्थीनींनी वनविभाग कार्यालयाला भेट दिली. व तिथे कार्यरत असलेल्या वनरक्षकांना राखी बांधली. त्याचप्रमाणे, याच विद्यार्थीनींनी नेहमीच समाजसेवेत तत्पर असलेल्या नगरपालिकेतील सफाई कामगारांना राखी बांधली. तसेच वनरक्षक व सफाई कामगारांचे या सणाच्या निमित्ताने तोंड गोड करण्यासाठी मिठाई वाटण्यात आली. तर इयत्ता ३ री व ५ वी च्या विद्यार्थीनींनी सावंतवाडी गॅस गोडाऊन मधील कर्मचारी, काॅटेज हॉस्पिटल मधील वॉर्डबॉय व डॉक्टर, सावंतवाडी पेट्रोल पंप येथे कार्यरत असलेले कर्मचारी तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस यांनादेखील राखी बांधली व ‘सामाजिक बांधिलकी’ हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला. सर्व कर्मचाऱ्यांचे विद्यार्थीनींनी मिठाईने तोंड गोड केले.

विद्यार्थीनींनी बांधलेल्या वरील सर्व राख्या इयात्ता १ ली ते ५ वी च्या सर्वच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या होत्या. वरील सर्व कार्यालयातील कर्मचारी समाजासाठी तत्परतेने कार्य करत असतात, समाजाच्या रक्षणासाठी धडपडत असतात. तसेच, समाजाला आपल्या परीने मदत करत असतात. अशा या समाजाच्या रक्षणासाठी व सेवेसाठी झटणाऱ्या समाजसेवकांशी आपुलकीचे व बांधिलकीचे नाते कायम टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या सणाच्या निमित्ताने एक छोटासा प्रयत्न केला. या उपक्रमासाठी शाळेतील सर्वच शिक्षकांचे सहकार्य लाभले. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व ही परंपरा अशीच पुढे जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

You cannot copy content of this page