किरण तांडेल याच्या शेंडी जाळीच्या सहाय्याने मासेमारी करण्याच्या व्हिडीओला तब्बल १४ लाख व्ह्यूवज…

*💫वेंगुर्ला दि.०६-:* वेंगुर्ला-आरवली टांक येथील मच्छीमार युवक किरण तांडेल याच्या शेंडी जाळीच्या सहाय्याने नदीतील मासेमारी करण्याच्या व्हिडीओला युट्युबवर सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल १४ लाख व्ह्यूवज मिळाले आहेत. आजच्या आधुनिक व यांत्रिकी मासेमारीच्या काळात लुप्त होत चाललेली पारंपरिक शेंडी पद्धतीने मासेमारी करण्याची पद्धत १४ लाख लोकांपर्यंत पोहचल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात १ जून ते १५ ऑगस्ट हा मासेमारी बंदीचा कालावधी असतो. हा पावसाळा व माशांचा प्रजनन कालावधी असल्याने या अडीज महिन्याच्या कालावधीत मच्छीमार आपल्या होड्या किनाऱ्यावर सुरक्षित ठेवतात. या कालावधीत मच्छिमार आपली यंत्रे, होड्या, मासे पकडण्याची जाळी यांच्या डागडुजीचे काम करत असतात. तसेच काही मच्छिमार आपल्या दैनंदिन रोजगारासाठी व जेवणासाठी नदी किवा खाडी पात्रात छोट्या जाळ्याने म्हणजेच शेंडी जाळीच्या साहाय्याने मासेमारी करत असतात. मागील पूर्ण वर्ष हे कोरोना महामारीच्या सावटाखाली गेल्याने मच्छीमारांवरही आर्थिक संकट ओढवले होते. या लॉकडाऊनच्या कालावधीत आरवली-टांक येथील मच्छीमार युवक किरण तांडेल याने खाडी पात्रात स्वतः पारंपरिक शेंडी पद्धतीने मासेमारी करतानाचा व्हिडीओ बनविला आणि आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून तो प्रसारित केला होता. २७ सेकंदाच्या या व्हिडिओत मासेमारी बरोबरच जाळीत मासे मिळाल्याचेही दिसत आहे. सात महिन्याच्या कालावधीत युट्युबवर हा व्हिडीओ तब्बल १४ लाख लोकांनी पहिला असून लुप्त होत चाललेली पारंपरिक शेंडी पद्धतीची मासेमारी एवढ्या लोकांपर्यंत पोहचविल्याबद्दल किरण याचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page