नारळी पौर्णिमेनिमित्त ३० ऑगस्ट रोजी मालवणात कल्चर रॅलीचे आयोजन

⚡मालवण ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ, मालवण रिक्षा संघटना, मातृत्व आधार फाउंडेशन, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पौर्णिमेनिमित्त दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मालवण शहरातून कल्चर रॅली काढण्यात येणार आहे. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती सर्वांसमोर यावी व पर्यटनात वाढ व्हावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मालवण येथील हॉटेल ऐश्वर्य येथे आयोजित पत्रकार परिषदेत कल्चर रॅली ची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अवी सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, विदेशी मद्य विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पप्या कद्रेकर, सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर क्लबचे कमलेश चव्हाण, किशोर दाभोलकर, दादा वेंगुर्लेकर, रामा चोपडेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष संस्कृती, इतिहास व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या बाबी महत्वाच्या असून हि संस्कृती पर्यटकांसह सर्वांसमोर आणण्याच्या दृष्टीने कल्चर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यटन व त्याच्याशी संलग्न इतर व्यवसायिकांचा समन्वयही या रॅलीद्वारे घडवून आणण्यात येणार आहे.

नारळी पौर्णिमे दिवशी दुपारी २ वाजता मालवण भरड नाका येथून या रॅलीस सुरुवात होऊन बाजारपेठ मार्गे बंदर जेटी येथे हि रॅली विसर्जित होणार आहे. रॅलीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीत तहसीलदार वर्षा झाल्टे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, तसेच आरटीओचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बंदर जेटी किनाऱ्यावर रॅली पोहचल्यावर रिक्षा संघटनेच्या वतीने मानाच्या श्रीफळाची पूजा अर्चा करून तो सागराला अर्पण करण्यात येणार आहे, असेही बाबा मोंडकर म्हणाले.

या रॅलीत जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायती यांच्या मार्फत स्थापना करण्यात आलेल्या विविध गावच्या ग्राम पर्यटन समिती, स्टॉल धारक, पर्यटन व्यावसायिक सहभागी होणार आहेत. तसेच मच्छिमार संघटना व मालवणवासियांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले. तर मालवणातील जास्तीत जास्त रिक्षा व्यवसायिकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन पप्या कद्रेकर यांनी केले.

You cannot copy content of this page