दादा साईल; वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र
कुडाळ, प्रतिनिधी
कुडाळ-मालवणमध्ये मंजूर झालेल्या कोणतेही विकासकाम हे मीच आणले आहे असे म्हणणारे वैभव नाईक उद्या चांद्रयान ३ चा प्रस्ताव मीच इस्रोकडे पाठवला होता असे म्हणाले तर नवल वाटायला नको, अशी खरमरीत भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी केली आहे.
कुडाळ आणि मालवण आगारात येणाऱ्या नव्या गाड्या या भाजप नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री रविंद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केल्या आहेत.
वैभव नाईकांसाठी आता ‘आयत्या बिळात नागोबा’ ही उक्ती लावताना सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली आहे. कारण आपल्या संस्कृतीत नागोबाला मोठे पवित्र स्थान आहे. तो स्वतःला हवी असणारी शिकार स्वतःच करतो. परंतु, वैभव नाईकांसारखे फक्त श्रेयवादासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी पाहिले की त्यांची किव करावीशी वाटते. जे लोकप्रतिनिधी कृतीतून जनतेची सेवा करतात ते कधीही श्रेयासाठी खोट्या बातम्या करत नाहीत.
आताच वैभव नाईक यांनी आपण कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या आणण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून जाहीर केले. वैभव नाईक नुसत्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जर नवीन गाड्या मंजूर होत असतील तर सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर का उतरावे लागते याचे उत्तर देखील द्यावे, असा कडक सवालही दादा साईल यांनी आहे.
