सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांचे आवाहन
मालवण दि प्रतिनिधी
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी हौशी नाट्य संस्थांकडून २१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी आपला सहभाग नोंदवून जिल्ह्यातील नाट्य चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा केंद्र समन्वयक संजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
६२ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २० नोव्हेंबरपासून राज्यातील विविध १९ स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहीत नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https:// mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका १५ सप्टेंबरपर्यंत ऑ नलाईन सादर कराव्यात. विहीत मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन बिभीषण चवरे यांनी केले आहे.
