माजी नगरसेवक शैलेश परब : क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात यशस्वी वाटचाल
⚡बांदा ता.२२-: मुंबई-गोवा महामार्गावरील समस्या मांडणारे गीत भजनाच्या माध्यमातून समोर आले आहे. भजनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविल्या जातात. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची स्पर्धा जिल्ह्यात आजपर्यंत झाली नाही. निवडून दिलेल्या रागातून गायन करणे खूप कठीण असते आणि हे पाऊल या ग्रुपने उचलले आहे. त्यामुळे पाडलोस व्हाट्सअप ग्रुप भविष्यात आदर्श ठरेल असे प्रतिपादन, मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब यांनी केले.
पाडलोस गाव वॉट्सअप ग्रुप आयोजित ‘राग आमचे भजन तुमचे’ या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन रवळनाथ मंदिर येथे माजी नगरसेवक शैलेश परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, पोलीस पाटील रश्मी माधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर, सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर, उपाध्यक्ष यशवंत सातार्डेकर, ग्रा. पं. सदस्य प्रतीक्षा गावडे, रोशनी गावडे, आदी उपस्थित होते.
ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर यांनी श्री. परब यांना ग्रुपच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी, पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. केवळ चर्चा करण्यासाठी नव्हे तर या व्हाट्सअप ग्रुप मार्फत लोकाभिमुख कार्य घडत असल्याचे उद्गार शैलेश परब यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच राजू शेटकर यांनी केले. सचिव अमेय गावडे, सहसचिव बापू गावडे, खजिनदार राजाराम गावडे, सहखजिनदार रोहित गावडे तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. बुवा अजित गावडे यांनी आभार मानले.
