बांदा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करा…

बांदा भाजपची आमदार नितेश राणेकडे मागणी..

बांदा/प्रतिनिधी
रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी मागणी बांदा उपसरपंच जावेद खतीब, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली. आमदार राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या संपर्क साधत वैद्यकीय अधिकारी नेमणूकसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.


वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे बदली झाल्यानंतर गेले अडीच महिने हे पद रिक्त आहे. याठिकाणी सर्वाधिक ओपिडी असून टेलिमेडिसिन केंद्र देखील आहे. बांदा हे महामार्गावरील महत्वाचे केंद्र असून याठिकाणी प्रसूती गृह आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे.
एमबीबीएस अधिकारी नसल्याने रुग्ण, नातेवाईक व विद्यार्थी यांना दाखले मिळविण्यासाठी सावंतवाडी किंवा ओरोस येथे जावे लागते. यामध्ये वेळ व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी द्यावा अशी विनंती आमदार राणे यांच्याकडे करण्यात आली. डॉ. धुरी यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार राणे यांना दिले.
यावेळी उपसरपंच श्री खतीब, श्री. काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, निलेश कदम, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.
फोटो :-
कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन वैद्यकीय अधिकारी देण्याबाबत विनंती करण्यात आली. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page