लाँग मार्चच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केली मागणी; सर्वपक्षीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा
बांदा/प्रतिनिधी
श्रेयवाद आणि राजकीय चपला बाजूला ठेवून आडाळी येथील एमआयडीसीत उद्योगधंदे आणि ही उद्योग नगरी तात्काळ विकसीत करा, आम्हाला न्याय द्या, परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार द्या, असे आवाहन करीत आडाळी तसेच दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आज शासनाच्या विरोधात आडाळी ते बांदा असा लाँग मार्च काढला. या मोर्चाला सर्वपक्षीयांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. तर लोकांच्या मागणीनुसार आता आडाळीत उद्योगधंदे आले पाहिजेत. त्यासाठी शासनाने तात्काळ सकारात्मक धोरण घेतले पाहिजे, असे आवाहन सर्वपक्षीयांकडुन करण्यात आले. यावेळी आठ किलोमिटर काढण्यात आलेल्या या मोर्चाला गावातील ग्रामस्थ सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला. बांदा येथे या मोर्चाच्या समारोप करण्यात आला.
आडाळी येथे प्रकल्प आणण्यात यावेत, त्या ठिकाणी रखडलेले प्लॉटचे वाटप करण्यात यावेत, स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी शासनाने सकारात्मक धोरण ठरविण्यात यावे या मागणीसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आडाळी सरपंच पराग गावकर यांनी केले.
यावेळी ते म्हणाले, आम्ही अनेक वेळा शासनाचे उंबरठे झिजवले. परंतु स्थानिक भूमिपुत्रांनी जमिनी देवून सुध्दा या ठिकाणी उद्योग आणण्यासाठी शासनाची अनास्था आहे. या ठिकाणी सत्तेत असलेले आणि आत्ता सत्तेत नसलेल्यांकडे आम्ही अनेक वर्षे मागणी करीत आहोत. परंतु याकडे कोणाचाही लक्ष नाही हे आमचे दुर्दैव आहे. यावेळी माजी आमदार तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आपली मते मांडली. या ठिकाणी राजकीय चपला बाजूला ठेवून आडाळीचा प्रश्न सुटणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने तसा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिक तरुण आजही नोकर्या पासून वंचित आहे. ही परिस्थिती बदलावी म्हणून मी सत्ताधारी पक्षात असताना सुध्दा सर्वांची माफी मागून या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी बेरोजगारांची अनेक वर्षाची मागणी मार्गी लागण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी म्हणाले, या ठिकाणी आम्ही अनेक वेळा उद्योग धंदे आणा म्हणून शासनाकडे मागणी केली. परंतू काही लोकांनी जाणीवपुर्वक हा प्रश्न तसाच ठेवण्यासाठी प्रयत्न केला. त्याचा फटका येणार्या पिढीला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ निर्णय होणे गरजेचे आहे. अन्यथा येणारी पिढी कधीही माफ करणार नाही.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, या ठिकाणी रोजगारासाठी येथील लोकांना गोव्याला जावे लागत आहे. अनेक तरुणाचे अपघात होवून त्यांना जीवाला मुकावे लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आता ग्रामस्थांनी घेतलेली आक्रमक भूमिका योग्य आहे. अन्यथा शासनाला जाग येणार नाही.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संजू परब, राजेंद्र म्हापसेकर, प्रमोद कामत, राजेंद्र निंबाळकर, सुधीर आडीवरेकर, दत्ताराम कोळमेकर, आनंद नेवगी, रविंद्र मडगावकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
