⚡मालवण ता.२०-: मराठी कवितेला, साहित्याला मोठी परंपरा आहे. मात्र, मराठी कवितेतील ओढ आज हरवत चालली आहे. म्हणूनच नवकवींनी लिहिण्याआधी मराठी कवितेची परंपरा समजून घेतली पाहिजे. लिहिण्या अगोदर प्रत्येकाने साहित्य रसिक व्हावे. झिम्माडच्या व्यासपीठावर साहित्यिकांनी एकत्रित येऊन प्रवाहित राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महेश केळूसकर यांनी येथे बोलताना केले.
महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्यावतीने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे ‘झिम्माड’ – मराठी कवितेच गणगोत हा दोन दिवसीय कला- साहित्य महोत्सव पार पडला. या महोत्सवाच्या प्रारंभी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कला दिग्दर्शक नितीन देसाई, कवी ना. धो. महानोर, यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महोत्सवाचे उदघाटन लेखिका रश्मी कशेळकर व साहित्यिक महेश केळूसकर यांच्या हस्ते फलक लेखन करून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्षा वृषाली विनायक, कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष किशोर कदम, सिद्धार्थ तांबे, कल्पना मलये, सरिता पवार आदी व इतर उपस्थित होते.
प्रारंभी वृषाली विनायक यांनी प्रास्ताविक केले तर स्वागताध्यक्ष किशोर कदम यांनी स्वागत केले. यावेळी राज असरोंडकर यांनी साहित्यिक, कलाकार यांच्या कार्याचा मोठा परिणाम समाजावर होत असतो, त्यामुळे कवी, साहित्यिकांनी समाजात सभोवताली जे काही घडत आहे त्यावर लिहिण, व्यक्त होणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे व गीतकार डॉ. विनायक पवार, निलेश शिनलकर यांनी विचार मांडले. तर उदघाटक रश्मी कशेळकर यांनी प्रत्येक कवितेला काहीतरी गाभा असतो, कवितेतून कवीचे चिंतन दिसून आले पाहिजे, झिम्माड ग्रुपने कवितेचे गणगोत वेगळ्या उंचीवर न्यावे, असे सांगितले.
सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार सुधीर चित्ते यांनी मानले. यावेळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले कवी, साहित्यिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.
