⚡मालवण ता.१०-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनएसएस विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, मालवण तसेच ग्रामपंचायत कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राष्ट्रीय सेवा योजना दत्तक गाव असलेल्या कांदळगाव येथे संपन्न झाले. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
कांदळगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर कांदळगावचे सरपंच रणजीत परब, वनपरिक्षेत्र अधिकारी सी. एच. जगदाळे, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. कैलास राबते, ग्रामपंचायत सदस्य महेश परब, सौ. अनघा कदम, संतोष पारकर, वनक्षेत्र कर्मचारी प्रकाश शिंदे तसेच सत्कारमूर्ती माजी सैनिक लक्ष्मण राणे व बाबुराव परब, ग्रामपंचायत कर्मचारी आशिष आचरेकर, गजानन सुर्वे, सुरेखा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रा. एस पी खोबरे यांनी मान्यवरांचे स्वागत करत प्रास्ताविक केले. यावेळी क्रांती दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक लक्ष्मण राणे व बाबुराव परब यांचा सरपंच रणजीत परब व वनपरिक्षेत्र अधिकारी सी. एच. जगदाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर एनएसएस विद्यार्थ्यांकडून वतीने माजी सैनिकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आपल्या मनोगतातून माजी सैनिक लक्ष्मण राणे व बाबुराव परब यांनी आपल्या सैनिकी काळातील गतस्मृतिना उजाळा देत सैन्यातील अनुभव कथन केले. सरपंच रणजीत परब यांनी विचार मांडत सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी सर्वानी पंचप्रण शपथ घेतली. या अभियानाचा एक भाग म्हणून माजी सैनिक, सरपंच व वनपरिक्षेत्र अधिकारी व एनएसएस विद्यार्थ्यांच्या हस्ते ७५ वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. हि झाडे कांदळगाव परिसरात लावून एक छोटीशी रोपवाटिका तयार करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. कैलास राबते यांनी केले तर आभार प्रा. खोबरे यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व एनएसएस स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
