सेवानिवृत्ती विषयक सुधारित आर्थिक लाभबाबत आदेश निर्गमित होतील

सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.०८-: महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडील शासन परिपत्रक क्र. वेतन – २०२३ / प्र.क्र. १३/सेवा-३ मंत्रालय मुंबई दि. २८/०६/२०२३ नुसार ३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यापुढील १ जुलैची एक काल्पनिक वेतनवाढ देऊन सेवानिवृत्ती विषयक सर्वप्रकारचे सुधारित आर्थिक लाभ मंजूर करण्याबाबत आदेश केले आहेत.अशी माहिती सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर यांनी दिली.

सदर आदेशाप्रमाणे या जिल्ह्यातील ३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या काही शिक्षकांनी आपापले मागणी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व ज्या कार्यालयाकडून सेवानिवत्त झाले त्या विकास गटाच्या गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या सर्व नोंदीसह परिपत्रकाप्रमाणे आपले अर्ज सादर केले आहेत.
परंतु गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनासंदर्भात पुढील कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याची बाब शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात आली आहे.
या लाभासाठी पहिला टप्पा म्हणजे संबंधित शिक्षकांची मूळ सेवापुस्तकात एक काल्पनिक वेतवाढ देऊन वेतन निश्चिती करणे व ती वेतन निश्चिती जिल्हा वित्त विभागाकडून पडताळणी करुन घेणे. तर दुसऱ्या टप्प्यात पडताळणी केलेल्या वेतन निश्चितीनुसार संबंधित शिक्षकाच्या मूळ सेवापुस्तकासह सुधारित निवृत्ती वेतन परिगणना पत्रक तयार करुन ते सुधारित निवृत्तीवेतन अंतिम आदेशसाठी आपल्या कार्यालयाकडे सादर करणे. या दोन बाबी होणे आवश्यक आहे. १ जुलै ही सर्वांसाठी वेतनवाढीची तारीख सहाव्या वेतन आयोगापासून सुरु झाली. त्यामुळे ३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १ जुलैच्या पुढील काल्पनिक वेतनवाढ मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही मात्र जे कर्मचारी ३० जून २००६ अखेर सेवानिवृत्त झाले असतील अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागील वर्षात मध्ये वेतनवाढ केव्हा मिळाली ती पाहावी लागेल. जर वेतनवाढ मिळालेलीच नसेल तर त्यांना १ जुलैचा लाभ मिळण्यास हरकत नाही मात्र मागील वर्षाच्यामधील कालावधीत वेतनवाढ मिळाली असली तर अशा कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार नाही.
गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार संबंधित शिक्षकांच्या काल्पनिक वेतनवाढ देऊन लाभ मिळण्यासाठी पुढील कार्यवाही होण्याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी यांच्याकडून गटशिक्षणाधिकारी यांना तातडीने उचित कार्यवाही करण्याबाबत आदेश निर्गमित होतील अशी अपेक्षा आहे.
अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, सोनू नाईक, रमेश आर्डेकर, बाबू परब व विजय मयेकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

You cannot copy content of this page