मुख्याधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवावी

अन्यथा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होईल:माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा इशारा

⚡मालवण ता.०१-: मालवण शहरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक हैराण बनले आहेत. वर्षभरापूर्वी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम घेण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना लेखी कळवूनही त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेला नाही. त्यामुळे लोकांच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी ही मोहीम हाती घ्यावी अशी सूचना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे.

श्री महेश कांदळगावकर यांनी
पत्रकात म्हटले आहे की, मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता त्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम आमच्या कालावधीत एका प्राणीमित्र संस्थेच्या माध्यमातून २०१७ मध्ये घेण्यात आली होती. परंतु काही कालावधीनंतर ही मोहीम थांबली होती त्यांनतर दोन तीन वेळा याबाबत निविदा प्रक्रिया करण्यात आली. परंतु त्याच दरम्यान असलेला कोविड कालावधी मुळे निविदा प्राप्त होऊ शकल्या नव्हत्या. २०२१ मध्ये या निविदेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आणी हि मोहिम हाती घेऊन मालवण शहरातील सुमारे ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. त्यामुळेच काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर उपाय योजना करता आली. परंतु पुढील काही वर्षे सातत्याने ही मोहीम सुरू ठेवणे आवश्यक होते. तरच एक दिवस यावर कायमस्वरूपी उपाययोजना होऊ शकणार होती. परंतु डिसेंबर २०२१ मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष पदाचा कालावधी संपल्यानंतर या मोहिमेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आला.

अजून नगरपालिका निवडणूका झाल्या नसल्याने गेले १८ महिने नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. परंतु या कालावधीत स्वतःहून तर नाहीच पण आठ महिन्यापूर्वी लेखी कळवूनही याबाबत कुठलीही दखल मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. या मोहिमेत सातत्य ठेवल्याशिवाय याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार नाही. सध्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासाबाबत अनेक तक्रारी माजी लोकप्रतिनिधींकडे येत आहेत. परंतु स्वतःच्या बदलीच्या प्रक्रियेत व्यस्त असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना अशा कामाकडे बघायला वेळ नाही असेच खेदाने म्हणावे लागत आहे. पण त्याचबरोबर शहरातील लोकांच्या सहनशीलतेचा अंत होण्याआधी ही मोहीम हाती घ्यावी अशी मागणी कांदळगावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page