सुभाष मोर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन

बांदा/प्रतिनिधी
श्री बांदेश्वर भूमिका देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष, सेवानिवृत्त शिक्षक तथा बांदा शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी सुभाष शांताराम मोर्ये (वय ७३) यांचे काल रात्री उशिरा म्हापसा गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


येथील डॉ. बी बी गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्टचे ते पहिले सचिव होते. जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार डॉ. गायतोंडे यांच्यासोबत त्यांनी सुरु केलेल्या शैक्षणिक कार्यात ते अखेरपर्यंत कार्यरत होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान संचालक तसेच माजी अध्यक्ष होते. शतायु ग्रंथालय असलेल्या नट वाचनालयचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते.
सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी सचिव म्हणून काम केले. ते विद्यमान सदस्य होते. बांदा विकास सोसायटीत देखील त्यांनी संचालक म्हणून काम केले होते. पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे. कै. डॉ. गायतोंडे यांच्या सहकार्याने त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांचा विज्ञान विषयात हातखंडा होता. त्यांना साहित्याची विशेष ओढ व अभिरुची होती.
यासाठी गेली ३० वर्षे ते येथील नट वाचनालयात कार्यरत होते. वाचनालयच्या विविध पदांवर ते कार्यरत होते. वाचनालयला अ वर्गात येण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्याच कार्यकाळात श्री बांदेश्वर मंदिराचा जोर्णोद्धार संपन्न झाला होता. सिंधुदुर्ग व गोव्यातील सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील त्यांचा लोकसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनाने बांदा शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, २ मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page