मालवणात शिवकालीन परंपरेनुसार मोहरम उत्सव साजरा

⚡मालवण ता.२९-: शिवकालीन परंपरा लाभलेला मालवण मधील मोहरम उत्सव आज मालवण शहरातून ताबूत (ताजिया) मिरवणुक काढून साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात, झुल्फीकार नाचवत आणि बहुसंख्य मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत हि ताबूत मिरवणूक पार पडली. मालवणातील सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणूनही ओळखल्या या मोहरम उत्सवात हिंदू धार्मियांनी देखील सहभागी होत ताजियाचे दर्शन घेतले.

मालवणच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्गमध्ये किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेले काही किल्लेदार मुस्लिम बांधव होते. तेव्हा या मुस्लीम बांधवांसाठी महाराजांनी किल्ल्यात मोहरम उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणारा हा ऐतिहासिक शिवकालीन परंपरा लाभलेला मोहरम ताजिया उत्सव आजही त्याच शिवकालीन प्रथेनुसार हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा होतो.

मोहरम म्हणजे हजरत, मोहम्मद पैगंबर, हजरत अली (रजी), हजरत, फातिम (रजी), इमाम हुसेन, हजरत इमाम हुसेन या पाच पवित्र आत्म्यांचे प्रतिक म्हणजेच ताबूत मानले जाते. किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्यात मुस्लिम व हिंदू बांधवांनी एकत्र येत तयार केलेले ताबूत किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात आणून ठेवले जाते. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यात आली. शिवराजेश्वर मंदिरासभोवताली ताबूत मिरवणूक झाल्यानंतर होडीच्या सहाय्याने समुद्र मार्गे आज दुपारी १ वाजता मालवण मेढा येथील हजरत नसूरुद्दीन शाह कादरी यांची दरगाह (पिराची भाटी) येथे किल्ल्यातील ताबूत आणण्यात आले. पिराची भाटी येथे स्थानिक मुस्लिम बांधवांकडून आणखी एक ताबूत साजवून ठेवलेले असते. या दोन्ही ताबूतची मालवण मेढा येथून बाजारपेठ भरड मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीतील दोन्ही ताबूत आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मुस्लिम तरुणांकडून झुल्फीकार निशाण नाचविण्यात आले. या मिरवणुकीत मालवणातील मुस्लिम तसेच हिंदू बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीतच्या मार्गावर मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांनी देखील ताबूतचे दर्शन घेतले. मेढा राजकोट येथे ताजीयाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले. यावेळी मालवण पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

You cannot copy content of this page