स्वतःच्या मोबाईलवरून शिक्षक माहिती भरणार नाहीत:शासनाने साहित्य पुरविल्यास सेवा देतील अशी समितीने केली आहे मागणी
ओरोस ता २८
जि प प्राथमिक शाळांना शासनाने आवश्यक साधनसामुग्री व इंटरनेट सुविधा अगोदर पुरवावी नंतरच शिक्षकांकडून आँनलाईन कामाची अपेक्षा करावी. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे शासनाच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारा बी ओ टी एप्लीकेशन वरून विद्यार्थी दैनंदिन आँनलाईन उपस्थिती व स्वाध्याय माहिती शिक्षकांच्याच वैयक्तिक मोबाईल वरून भरणे बाबतचे प्रशिक्षण 30 जुलै पर्यंत सुरू आहे. याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा तीव्र विरोध आहे.
याबाबत समितीच्या शाखा सिंधुदुर्ग कडून प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच राज्य आयुक्त (शिक्षण),पुणे, राज्य प्रकल्प संचालक पुणे शिक्षण संचालक पुणे,राज्याध्यक्ष शिक्षक समिती राज्यशाखा आदींना निवेदन देवून स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक व जिल्हा सचिव सचिन मदने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
