मालवण तालुक्यात केवळ ११ शाळाच झाल्या सुरू

एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ

*💫मालवण-:* शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिल्यानंतर या आदेशानुसार आज मालवण तालुक्यात ३६ शाळांपैकी केवळ ११ शाळा सुरू झाल्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले कोरोना तपासणीचे अहवाल, पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी न दिलेले संमतीपत्र, परगावी गेलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना तपासणीस दाखविलेली अनुपस्थिती या कारणांमुळे तालुक्यात काहीच शाळा सुरू झाल्या. या शाळा सुरू झाल्या असल्या तरी या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी असल्याने शासनाच्या निर्णयाला विद्यार्थी आणि पालकांनी म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याचे उघड झाले आहे. तर गेले चार दिवस आरोग्य विभागाने कोरोना तपासणी केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी एका शिक्षकाचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह शिक्षक सापडलेली संबंधित शाळा आज बंद ठेवण्यात आली होती. तर वराड, पोईप, असरोंडी, कट्टा येथील वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत हमी पत्र न दिल्याने या शाळा सुरू होण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. तालुक्यातील ४६६ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासणी अहवालपैकी अद्याप २३९ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मालवण तालुक्यात गेले १५- २० दिवस शाळांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत मोठ्या हालचाली सुरू झाल्या. शाळा आणि परिसराची साफसफाई करणे, शाळेचे निर्जंतुकीकरण करणे, शाळा सुरू करण्याबाबत व्यवस्थापन समिती, शिक्षक व पालकांची एकत्रित सभा घेणे, विद्यार्थ्यांचे गट पाडणे, प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करणे, शाळा सुरू करण्याबाबत पालकांकडून संमतीपत्र घेणे आदि व इतर कामाच्या दृष्टीने सर्वजण कामाला लागले. मालवण तालुक्यात शाळा आणि ज्युनियर कॉलेजची संख्या ३६ आहे. त्यातील ३३ शाळांनी निर्जंतुकीकरण केले असून तीन शाळांनी निर्जंतुकीकरण केलेले नाही. तर तालुक्यात ३६ शाळांमधील ३६८ शिक्षकांची आणि १२८ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४६६ कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. ३६७ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल प्राप्त झाले असून २३९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या प्रलंबित अहवालामुळे मालवण तालुक्यात बऱ्याच शाळा सुरू झालेल्या नाहीत. तर शासनाने काही दिवस अगोदर जाहीर करूनही काही शाळांमधील शिक्षक नोकरीच्या ठिकाणी न परतल्याने या शिक्षकांची तपासणी होणे बाकी आहे. आज मालवण शहरातील भंडारी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, रोझरी इंग्लिश स्कुल, जय गणेश इंग्लिश स्कुल, कन्याशाळा या चारच शाळा सुरू झाल्या होत्या. तर ग्रामीण भागातील चौके हायस्कुल, वडाचापाट हायस्कुल, बिळवस हायस्कुल, देवबाग हायस्कुल, तळगाव हायस्कुल, रेकोबा हायस्कुल, ओझर हायस्कुल या शाळा सुरू झाल्या होत्या अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी उदय दीक्षित यांनी दिली आहे. तालुक्यात ११ शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र अल्प होती. दरम्यान आज मालवण शहरात सुरू झालेल्या चारही शाळांना मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी भेट देत पाहणी केली व शाळांच्या मुख्याध्यापकांना व शाळा व्यवस्थापकांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

You cannot copy content of this page