*वेतन न दिल्याने “त्या” कंत्राटी कामगारांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन

मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे गेल्या तीन चार महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक बनलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता शहरात कचरा उचल करण्याचे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाची उपासमार होट आहे. त्यामुळे थकीत वेतन मिळवून देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कामगारांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. मालवण शहरातील कचरा उचल व व्यवस्थापन करण्यासाठी मालवण नगरपालिकेकडून डिसेंबर २०१९ मध्ये स्वच्छता विभागासाठी दोन ठेके प्रसिद्ध केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ठेकेदारांनी मालवण नगरपालिकेला कचऱ्याचा उठाव करण्यासाठी कामगार पुरवणे तसेच चालक पुरविणे असे ठेके घेतले. या ठेक्यानूसार कचऱ्याचा उठाव करण्यासाठी एका ठेकेदाराने १९ कामगार तर दुसऱ्या ठेकेदाराने कचरा गाडीवर चालक पुरविण्यासाठी ६ चालक नगरपालिकेला दिले. पूर्वी नियमित पगार देणाऱ्या या दोन्ही ठेकेदारांनी कोरोना महामारीच्या काळात कामगारांचा पगार रखडविला. गणेश चतुर्थी व दिवाळी काळात देखील कामगारांना पगार न मिळाल्याने त्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर कंत्राटी कामगारांचा पगार सुरु झाला होता मात्र संबंधित ठेकेदारांनी पुन्हा एकदा पगार रखडविला असून स्वच्छता कंत्राटी कामगारांचा दोन महिन्यांचा आणि कचरा वाहक गाडीवरील चालकांचा चार महिन्यांचा पगार दिलेला नाही. गेले वर्षभर कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता प्रामाणिक सेवा देऊनही वारंवार पगार थकीत ठेवला जात असल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे असे सांगत कंत्राटी कामगार व चालकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे. याबाबत कंत्राटी कामगारांनी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे दोन्ही ठेकेदारांनी आम्हाला तीन चार महिन्याचे वेतन दिले नाही, आम्हला हॅण्ड ग्लोव्हज देत नाहीत तसेच कोरोना काळात वावरत असूनही मास्क व सॅनिटायजर दिले जात नाही. तर आजपर्यंत गणवेशही दिला गेला नाही. कोरोना काळात ठिकठिकाणी कचरा उचल करण्याचे व त्याची विल्हेवाट लावण्याचे काम आम्ही करत असूनही आमच्या जीविताची काळजी घेतली जात नाही. आमच्या समस्यांकडे पद्धतशीरपणे डोळे झाक करून आमच्या जीवाशी खेळले जात आहे. अशी व्यथा कामगारांनी निवेदनाद्वारे मांडत न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

You cannot copy content of this page