शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती: सावंतवाडी येथेआढावा बैठक संपन्न..
⚡सावंतवाडी ता.२३-: आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणखीन बळ देण्यासाठी एन.डी.आर.एफ, एस.डी.आर.एफची टीम गोव्यातून मागवण्यासंदर्भातील सुचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना केली असून त्यांनी तशी मागणी केल्यावर तातडीनं राज्यसरकारच्या माध्यमातून त्या टीमची पूर्तता जिल्ह्यासाठी केली जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. नगरपालिका कार्यालय सावंतवाडी येथे शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांंची बैठक पार पडली.
दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या अपेक्षा सरकार आणि प्रशासनाकडून असतात. त्यामुळे कुणाचा जीव जाऊ देऊ नका, लोकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करा अशा सुचना दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांंना दिल्या. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, सीओ प्रजित नायर,पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, डीएओ नवकिशोर रेड्डी यांसह जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करत आढावा घेण्यात आला.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहिती नुसार जिल्ह्यात 23 जुलै ते 27 जुलै या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी इर्शाळवाडी येथील घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोळंबे, असनिये, शिरशिंगे, आंबोलीसह काही भागात दरड कोसळण्याच्या स्थिती असलेल्या ठिकाणी दक्षता घेण्याची सुचना त्यांनी केली. तर झोळंबेमधील ग्रामस्थांना विठ्ठल मंदिर परिसरात सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. तसेच उंचावरील ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी तात्पुरता स्वरूपात स्थलांतरीत व्हावं, काळजी घ्यावी असं आवाहन करत अधिकाऱ्यांंना त्यासंबंधी सुचना दिल्या. संकटकाळात जनतेच्या अपेक्षा सरकार आणि प्रशासनाकडूंन असतात. त्यामुळे लोकांचे जीव जाऊ देऊ नका, लोकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करा असे आदेश त्यांनी दिले.
दरम्यान, दोडामार्ग, बांदा गावातील आपत्कालीन व्यवस्थापनासह मडखोल,ओटवणे, गेळे यांसह नदीकिनारील भागात दक्षता घेण्याची सुचना त्यांनी केली. आंबोलीसह दरड कोसळण्याची शक्यता असतील त्याठिकाणी अलर्ट राहण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी दिले. दोडामार्ग तिलारी पाणी पाण्यात होणारी वाढ पाहता त्या ठिकाणी अधिकची दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले. तर तेरोखोल नदीकिनारीही जागरूक राहण्याची सुचना केली.वेंगुर्ला तहसीलदारांना यांनाही दक्ष राहण्याचे आदेश दिले. तर नुकसानग्रस्तांना येत्या चार ते पाच आपल्या व काही ट्रस्टच्या माध्यमातून मदत पोहोचवणार असून सरकारची मदत देखिल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्र्याना सांगून पोहचवू अशी माहिती दिली.
ओटवणेतील शाळकरी मुलाचा मृत्यू, वैभववाडीसह जिल्ह्यात काही ठिकाणी शॉक लागून जनावरांचे झालेले मृत्यू व पावसापुर्वी मेनलाईनवरील झाडांच्या फांद्या न तोडल्यान होणाऱ्या दुर्घटनांबाबत वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना शिक्षणमंत्री मंत्री व जिल्हाधिकारी यांनी खडेबोल सुनावले. लाईनवरील फांद्या बांधकाम विभाग तोडत असं सांगत समर्पक उत्तर न देणाऱ्या अधिक्षकांस जिल्हाधिकारी यांनी ‘स्पेशल टीम’ नेमण्याचे आदेश देत लोकांचे जीव जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. तर निदान लोकांचे फोन उचलत चला अशा शब्दांत मंत्री केसरकर यांनी अधिक्षकांना सुनावल. दरम्यान, बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी नाराजी व्यक्त करत महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.बांद्यातील ट्रान्स्फॉर्मर पाण्यात जात असून त्याकडेही अधिकारी लक्ष देत नाही असा मुद्दा बांदा सरपंचांनी उपस्थित केला. तर आंबोलीत दक्षता घेण्यासह रस्त्याशेजारी रेडियम लावण्याचा सुचना केल्या. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण माहिती पुस्तिकेच प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, सीओ प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,
अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता, देवधर मध्यम पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता, सिंधुदूर्ग पाटबंधारे प्रकल्प, बांधकाम विभाग, सावंतवाडी, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिंधुदूर्ग व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.