कृषी यांत्रिकी उपकरणासाठी ६६६७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

*_▪️निधी अभावी केवळ १२० लाभार्थींना मिळणार लाभ : कृषी समिती सभेत माहिती;किमान १५ कोटी निधी देण्याचा ठराव_*

सिंधुदुर्गनगरी ता ०१ राज्य कृषी विभागाकडे ५० टक्के अनुदानावर कृषी यांत्रिकी उपकरणे योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील ६६६७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यांना लाभ देण्यासाठी २४ कोटी २० लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात १ कोटी ३३ लाख निधी मंजूर असल्याने केवळ १२० लाभार्थींना लाभ देता येणार आहे. अशी माहिती आजच्या कृषी समिती सभेत देण्यात आली. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देता यावा. यासाठी शासनाने किमान १५ कोटी निधी द्यावा. असा ठराव आजच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद कृषी समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्‍या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज पार पडलेल्या सभेत सदस्य रणजीत देसाई, प्रितेश राऊळ, महेंद्र चव्हाण, अनुप्रिती खोचरे, सुधीर नकाशे, आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. आजच्या कृषी समिती सभेत राज्य अधीक्षक कृषी विभागाकडील योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या पावर टिलर, ट्रॅक्टर या सारख्या उपकरणांची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून जिल्ह्यातील ६६६७ शेतकऱ्यांनी कृषी अवजारांसाठी प्रस्ताव केले आहेत. परंतु एवढ्या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ कोटी २० लाख निधीची आवश्यकता आहे .मात्र शासनाने केवळ १ कोटी ३३ लाख निधी मंजूर केला आहे. या निधीतून केवळ १२० एवढ्या शेतकऱ्यांना लाभ देता येऊ शकतो. अशी माहिती सभेत देण्यात आली. तर जिल्ह्यातील शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा लाभ देता यावा यासाठी शासनाने किमान १५ कोटी रुपये निधी या योजनेसाठी मंजूर करावा. असा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीपोटी शासनाकडे २४ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात १२ कोटी १२ लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ कोटी ३४ लाख रुपये निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. अशी माहिती सभेत देण्यात आली. जिल्ह्यातील १७५ लाभार्थी बायोगॅस अनुदानाच्या प्रतीक्षेत सन २०१९- २० या आर्थिक वर्षात जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या बायोगॅसच्या १७५ लाभार्थीना अनुदानाचा लाभ देण्यासाठी २१ लाख ७० हजार एवढ्या निधीची आवश्यकता आहे . मात्र शासनाकडून अद्याप अनुदान प्राप्त न झाल्याने अद्यापही १७५ लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. तरी मार्चअखेरपर्यंत हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली . तसेच २०२०- २१ या आर्थिक वर्षात ४२२ बायोगॅस जिल्ह्यात बांधण्याचे उद्दिष्ट आहे . त्यापैकी आतापर्यंत ३११ बायोगॅस बांधून पूर्ण झाले आहेत .यासाठी ५४ लाख ६० हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून प्रत्येक लाभार्थीला १२ हजार रुपये पर्यंत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. उर्वरित खर्च संबंधित लाभार्थींनी करावयाचा आहे. अशी माहिती सभेत देण्यात आली.

You cannot copy content of this page