*💫मालवण दि.०१-:* कुसुमाग्रजांनी केलेले मराठी भाषेविषयीचे कार्य हे प्रेरणादायी असून त्यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. मराठी भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृती टिकविण्यावर कुसुमाग्रजांनी व तत्कालीन साहित्यिकांनी केलेले कार्य व त्यांचे योगदान दृष्टिआड करून चालणार नाही म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी थोर साहित्यिकांना समजावून घेणे त्यांच्या ग्रंथाचे वाचन करणे, वाचन संस्कृती टिकवणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मांडले म्हणाले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत जागतिक मराठी राजभाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार कोविड- १९ चे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत मराठी भाषेची गौरवशाली परंपरा मराठी भाषेचा इतिहास व मराठी भाषेतील कुसुमाग्रजांचे योगदान किती मोठे आहे, याचे विवेचन केले. तर डॉ. उज्वला सामंत यांनी मराठी भाषेच्या महत्वाबरोबरच केवळ एका दिवसासाठीचा हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता त्याचा व्यापकपणा वाढला पाहिजे मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे त्या साहित्यिकांचे ऋण कायमस्वरूपी स्मरणात ठेवणे का गरजेचे आहे याविषयी आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रा. डॉ. आर. एन.काटकर, प्रा. डॉ. डी. व्ही. हारगिले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. एच. एम. चौगुले, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. पी. बी. खरात आदि प्राध्यापक मंडळी व मराठी विभागाचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. राबते यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा ….
