त्याच पितामहाना २०१९ मध्ये भास्कर जाधव यांनी दगा दिला होता

काका कुडाळकर:अजित पवार यांच्यावरील टीकेला दिले उत्तर

कुडाळ, प्रतिनिधी-:संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त काल (शुक्रवारी) झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेली टीका ही उद्विग्न होऊन केलेली आहे. खरे म्हणजे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाच्या वाटचालीत अहोरात्र मेहनत करून योगदान दिलेले आहे. अशावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपल्यावर संघटनात्मक जबाबदारी द्यावी आणि इतरांना हवे असे वाटणारे विरोधी पक्षनेते पद त्याग करण्याची सुद्धा तयारी दाखवलेली होती. तरीही त्याची योग्य दखल शरद पवार यांनी घेतली नाही, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. अशावेळी सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे त्यांनी या मागची वस्तूस्थिती सांगितली याचा अर्थ खालच्या पातळीवर टीका केली असा होत नाही.


खरे म्हणजे आमदार भास्कर जाधव यांना दुसऱ्यांना गद्दार म्हणण्याचा नैतिक अधिकारच नाही. ज्या पितामहांवर अजित पवार बोलले म्हणून त्यांना राग आला आहे, त्याच शरद पवार यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे तिकीट देवून भास्कर जाधव यांना आमदारकीची संधी दिली होती. भास्कर जाधव यांना पक्षात फार काळ काम न करताही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष केले होते. मात्र, असे असतानाही भास्कर जाधव तुम्ही २०१९ मध्ये याच पितामहांना फक्त आणि फक्त शिवसेनेत गेल्यानंतर मंत्रीपद मिळेल या आशेने राष्ट्रवादी सोडून ऐनवेळी दगा दिला होता, हा इतिहास आहे. त्याच पितामहांबद्दल आपल्याला कळवळा यावा म्हणजे हे फक्त आणि फक्त नकाष्रू आहेत. त्यामुळे भास्कर जाधव आपण किती आटापिटा केला तरी अजित पवार यांच्या महाराष्ट्रातील ताकदीला आपण केसाएवढेही नुकसान करू शकत नाही.
त्यामुळे दुसऱ्यांना गद्दार म्हणण्याअगोदर आपण दोन-दोन पितामहांना दुःख दिलेल आहे हे विसरू नये, अशी खरमरीत टीका सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page