उदयोन्मुख गायकांना संधी देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन
⚡दोडामार्ग,ता.१५-: उदयोन्मुख कलाकारांना संधी देण्यासाठी तालुक्यात प्रथमच खुल्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिव्हाळा क्रियेशन,बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग, नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर, स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्ग, सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल,शारदा संगीत विद्यालय साटेली,आणि संगीत साधना विद्यालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कलाकारांना स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजक विविध उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.
स्पर्धेसाठी अनुक्रमे पाच,तीन व दोन हजार रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.शिवाय उत्तेजनार्थ म्हणून दोघांना एक हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र् देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी १५ ऑगस्ट पर्यंत आयोजकांकडे नाव नोंदणी करावी. शास्त्रीय गायन स्पर्धा १५ वर्षापुढील वयोगटातील स्पर्धकांसाठीच आहे. स्पर्धेसाठी पाचशे रुपये प्रवेश शुल्क आहे. पूर्ण व अचूक भरलेले प्रवेश अर्जच स्वीकारले जातील.
ऑनलाईन लाईव्ह स्पर्धा
यां स्पर्धेला जोडून ऑनलाईन स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धकांनी सादर केलेले देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत सादर केलेले व्हिडीओ जागर दशावतार युट्युब चॅनलवरुन लाईव्ह प्रक्षेपित केले जातील. व्हिडीओला मिळालेल्या व्ह्यूजनुसार अनुक्रमे तीन क्रमांक काढून या स्पर्धेसाठी वेगळी बक्षिसे दिली जातील.त्या स्पर्धेसाठी अनुक्रमे दीड हजार,एक हजार व पाचशे रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह दिली जातील.प्रवेश शुल्क ऑनलाईन पाठविण्यासाठी पत्रकार शंकर जाधव,शांताराम बेनकर,सागर नाईक,प्रेमप्रकाश नाईक यांच्याशी संपर्क साधावा.
