⚡मालवण ता.१४-: राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची देवगड तालुका काँग्रेस कमिटी निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवगड तालुका काँग्रेस कमिटीच्या स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समित्या गावपातळीवर जाऊन बांधणी करण्याची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे.
ओरोस येथे झालेल्या जिल्हा काँग्रेस च्या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री. शशांक बावचकर यांच्या उपस्थितीत माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्याशी चर्चा करून जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर याची देवगड निरीक्षक पदी नियुक्ती केली. जिल्ह्यातील इतरही तालुक्याची जबाबदारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या गेल्या.
कुडाळ मालवण विधानसभा २०१९ चे उमेदवार राहिलेले अरविंद मोंडकर यांच्याकडे पूर्वी कुडाळ तालुक्याची जबाबदारी होती. त्यानुसार मतदारसंघ म्हणून कुडाळ मध्ये देखील चांगली कामगिरी केली. नगरपंचायत निवडणूक पूर्वी तिथे बैठका घेत तेथील अभय शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, विजय प्रभू, मंदार शिरसाट व इतर पदाधिकारी यांच्याशी समन्वय राखून उत्तम कामगिरी केली होती. या अनुषंगाने आता मोंडकर यांना आता देवगड तालुका काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. येत्या आठवड्यात देवगडात जाऊन तात्काळ बैठका व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन बूथ सक्षमीकरण करण्यावर भर देणार आहोत असे अरविंद मोंडकर यांनी सांगितले.
