⚡मालवण ता.०४:- मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर, कांदळगाव या माध्यमिक शाळेत गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त विद्यार्थ्यानी शिक्षकांना नमस्कार करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. अभय शेरलेकर यांच्या हस्ते ओझर विद्या मंदिरचे संस्थापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगावचे राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक स्वर्गीय वसंत विश्राम पाटील यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेतील साहाय्यक शिक्षक श्री.पी.के. राणे तसेच साहाय्यक शिक्षक श्री. प्रवीण पारकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करुन गुरुपौर्णिमेच्या दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.
शिक्षक श्री. शेरलेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. जाधव, शिक्षक श्री. नितिन परुळेकर, एस.जे.सावंत, सौ.वराडकर, शिक्षकेतर कर्मचारी श्री.आर.जे.जाधव, पी. व्ही.खोडके, मधुसूदन परुळेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
