⚡बांदा ता.०१-: नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांना एकत्र घेऊन छोटी समूह विद्यापीठे स्थापन करणे शक्य होणार आहे. यासाठी किमान पाच महाविद्यालये किमान विद्यार्थी संख्या व नॅक मानांकन या अटीवर सामंजस्य करार करून समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. यामुळे स्थानिक भाषा, संस्कृती, व्यवसाय व गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करणे शक्य होईल व त्याचा फायदा ग्रामीण भागातील स्थानिक विद्यार्थ्यांना होईल असे प्रतिपादन गोगटे वाळके महाविद्यालयाच्या स्टाफ अकादमीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या स्टाफ अकादमीचे समन्वयक प्रा दत्तगुरु जोशी उपस्थित होते. याप्रसंगी स्टाफ अकादमीचे सदस्य डॉ. अभिजीत महाले यांनी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार दोन प्रकारचे पदवी शिक्षण उपलब्ध होऊ शकते. जे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छितात व भविष्यात संशोधन करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी चार वर्षाचा पदवी ऑनर्स अभ्यासक्रम उपलब्ध होईल. तसेच जुना तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम कायम राहील. जे विद्यार्थी चार वर्षाचा ऑनर्स अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना एका वर्षात पदव्युत्तर पदवी मिळवता येईल. चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना पहिल्या वर्षानंतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण होईल दुसऱ्या वर्षानंतर पदविका तिसऱ्या वर्षानंतर पदवी तर चौथ्या वर्षानंतर ऑनर्स पदवी मिळेल त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होतील असे याप्रसंगी अभिजीत महाले यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ अकादमीचे समन्वयक डॉ. दत्तगुरु जोशी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत स्टाफ अकादमीचे डॉ मिलन वालावलकर यांनी केले. मान्यवरांचे आभार डॉ. अभिजीत महाले यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.