बांदा/प्रतिनिधी
जीवनात योग आणि प्राणायाम याला खूप महत्त्व आहे. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगासनांमुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य देखील चांगले राखण्यासाठी मदत होते. निरोगी आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे योग होय. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ज्यामध्ये शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याचा यामध्ये समावेश आहे. तसेच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करणे यासाठी योग महत्त्वाची भूमिका बजावतात. योगाद्वारे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. मन, मनगट आणि मेंदू बळकट योगाशिवाय पर्याय नाही. असे प्रतिपादन गोगटे वाळके महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रा रमाकांत गावडे यांनी केले.
गोगटे वाळके महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्याख्यान आणि प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. गावडे यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक आणि त्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. काजरेकर यांनी आंतरराष्ट्रीय योगाचा इतिहास आणि योगाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रश्मी काजरेकर यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. किशोर म्हेत्री यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक पुंडलिक घाडी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
