ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
मालवण दि प्रतिनिधि
मालवण तालुक्यातील तोंडवळी वरची पूर्ण प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाला कामगिरी शिक्षक म्हणून कार्यमुक्त करण्याचा घाट शिक्षण विभागामार्फत घातला जात असून याची माहिती तोंडवळी ग्रामस्थांना मिळताच तोंडवळी ग्रामस्थ व पालकांनी मालवण पंचायत समिती कार्यालयावर धडक देत गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर आणि गटशिक्षणाधिकारी संजय माने यांना शाळेतील कोणत्याही शिक्षकाला कामगिरी शिक्षक म्हणून कार्यमुक्त करू नये अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
तोंडवळी वरची पूर्ण प्राथमिक शाळा ही पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण देणारी शाळा असून या शाळेतील कार्यरत शिक्षक हे अभ्यासा बरोबरच स्पर्धा परीक्षा आणि विविध उपक्रमासाठी विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असल्याने ही शाळा शैक्षणिक गुणवत्ता असलेली शाळा म्हणून ओळखली जाते. या पार्शवभूमीवर या शाळेतील एका शिक्षिकेला कार्यमुक्त करण्याचा घाट शिक्षण विभागामार्फत घातला जात असून हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचे कोणतेही सहकार्य लाभणार नाही असा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी दिला.
यावेळी झालेल्या चर्चेत बदली प्रक्रियेमुळे काही शाळेत शाळेत शिक्षक कमी आहेत. काही शाळेत कामगिरीवर शिक्षक देण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक डीएड बीएड धारक यांना तेथील शाळेत तात्पुरती स्वरूपात स्वंसेवक म्हणून नियुक्ती देण्याबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांच्यात समतोल रहावा त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. असे गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी दीक्षित यांनी सांगितले. यावर पालक, ग्रामस्थ यांनी आपल्या मागण्यांबाबत प्राधान्याने विचार करावा. आमचेही आपल्याला सहकार्यच असेल. असे स्पष्ट केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश चव्हाण, सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, माजी सरपंच आबा कांदळकर, प्रतीक्षा पाटील, गणेश तोंडवळकर यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
