आंबोली घाटातील मृतदेहाची ओळख पटण्यास अपयश…

तीन दिवसापुर्वीची घटना ; पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांची माहीती

सावंतवाडी ता.२१-: आंबोली घाटामध्ये मंगळवारी आढळून आलेला मृतदेह बुधवारी सकाळी पोलिसांकडून आंबोली रेस्क्यू टीमच्या सहाय्याने वर काढण्यात आला. मात्र सदर मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना अपयश आले असून प्राथमिक तपासात हा घातपात की आत्महत्या याबाबत काहीच समोर आले नाही अशी माहीती पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

मृतदेहाचे शवविच्छेदन सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ओमकार कुबडे यांनी केले असून व्हिसेरा राखून ठेवला असेही श्री अधिकारी यांनी सांगितले.


आंबोली येथे मंगळवारी सायंकाळी उशिरा धबधबा परिसरात दरीत सुमारे दोनशे फुट खोल पुरुष जातीचा मृतदेह आही ग्रामस्थांना दिसून आला होता मात्र अंधार पडल्याने पोलिसांनी सदर मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम राबविली नव्हती. बुधवारी सकाळी आंबोली रेस्क्यू टीमच्या सहाय्याने तो मृतदेह वर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी भेट दिली तर सायकांळी अप्पर पोलिस अधिक्षक नितिन बगाटे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याला भेट देत सविस्तर माहीती घेतली.


सदर मृतदेह अंदाजे ३५ ते ४० वर्षाचा असून अंगावर पांढरा व पिवळा पट्टा असलेला टीशर्ट व काळी हाफ पॅन्ट असून तीन दिवसापूर्वीचा हा मृतदेह असल्याचे पोलिस निरिक्षक श्री अधिकारी यांनी सांगितले. मृतदेहाच्या अंगावर खरचटलेले व्रणा व्यतिरिक्त डोक्याला जखम असून ती दरीत पडल्याने होऊ शकते त्यामुळे हा घातपातही म्हणू शकत नाही मात्र सर्व शक्यता पडताळून तपास करण्यात येणार आहे. मृतदेहाचे एकूण वर्णन पाहता तो मजूर असावा असे समजते त्यामुळे एखाद्या वेळी स्वतःहून आत्महत्या कीवा तोल जाऊन पडून मयतही होऊ शकतो. त्यादृष्टीने तपास केला जाईल. याव्यतिरिक्त मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम चिन्ह, वैशु व वनिथा असे नाव गोंदलेले आहे. वनिथा या नावात था हा शब्द शक्यतो कर्नाटक पट्ट्यात वापरतात त्यामुळे हा इसम कर्नाटक पट्ट्यातील आहे का हा तपास केला जाणार आहे असेही श्री अधिकारी म्हणाले.


सदरचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक शिंदे यांच्यासह आंबोली रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर व राकेश अमरुसकर यांनी दोरीच्या सहाय्याने दरीत उतरले. तर दीपक शिंदे, प्रथमेश गावडे, राजू राऊळ, मायकल डिसोजा, अमरेश गावडे, वैभव गावडे, विशाल बांदेकर तसेच रिक्षाचालक रमेश गुरव यांनी मृतदेह बाहेर सहकार्य केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, हवालदार मुकुंद सावंत, हे. कॉ. दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, महेश निरवडेकर, पोलीस नाईक मनिष शिंदे, कॉ. अभिषेक कांबळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page