आठ दिवसात मोरी नव्याने बांधण्याचे अभियंत्याचे आश्वासन
*💫मालवण दि.२६-:* चिंदर-कुडोपी-भूदवळे रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीत पूर्णपणे वाहून गेल्याने ग्रामस्थ व शाळकरी मुलांचा शहराशी संपर्क तुटला होता. या मोरीच्या तात्पुरत्या दुरुस्ती पलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन मोरी उभारण्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याने पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी मोरीच्या ठिकाणी पाहणी करत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या अभियंत्यांचे लक्ष वेधले. यावेळी अभियंत्यांनी आठ दिवसात मोरी बांधण्याचे आश्वासन दिले. मालवण तालुक्यातील चिंदर-कुडोपी-भूदवळे या रस्त्यावरील मोरी ढगफुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेली होती. यामुळे तेथील ग्रामस्थ व शाळकरी मुलांचा मालवण शहराशी संपर्क तुटला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्याकडून मोरीची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. परंतु ती पुरेशी नसून अद्याप नवीन मोरीच्या बांधकामाला परवानगी नसल्याने या मोरी अभावे या मार्गावरून वाहतूक पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शाळेतील मुलांचे नुकसान होणार असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी या मोरीची पाहणी केली. तसेच परुळेकर यांनी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्याशी चर्चा केली. यावेळी परुळेकर यांच्यासमवेत उपसरपंच गायत्री परब, आनंद पडवळ, दिनानाथ पडवळ, अनिल हिर्लेकर, प्रशांत पडवळ, अक्षय पडवळ, सुधीर पडवळ, विकास हडकर, बाळकृष्ण पडवळ, गणेश परब आदी उपस्थित होते. यावेळी अभियंत्यांनी आठ दिवसात मोरी बांधणार व नवीन मोरी पुराहाणी मध्ये प्रस्तावित करणार असे आश्वासन दिले.