जिल्हा बँक सहकार्य करणार: मनीष दळवी;बांदा विकास संस्थेच्या कृषी भवनचे करण्यात आले उद्घाटन
बांदा ता.२८-:
विकास संस्थांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारून शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे असून त्यासाठी संस्थांना जिल्हा बँक साथ देईल. शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून संस्था मजबूत करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता एवढा मोठा सभागृह बांधणारी ही एकमेव संस्था असून सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी बांदा वासीयांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी बांदा येथे केले.
ते बांदा ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा मंडळ बांदा या संस्थेच्या सहकार कृषी भवन व सभागृहाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक रवींद्र मडगावकर, श्रीपाद अळवणी, एस आर सावंत, गजानन गायतोंडे, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा सरपंच प्रियंका नाईक, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, संस्थेचे चेअरमन घनश्याम धुरी, भाजप तालुकाध्यक्ष महेश धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे मनीष दळवी म्हणाले, बांदा विकास संस्थेच्या मेहनतीने फळ या सभागृहातुन दिसते. यापुढे संस्थांना व्यावसायिक स्वरूप देणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी संस्थांनी झटून काम केले पाहिजे. शेतमाल खरेदी करणे आदी सह विविध कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे त्यासाठी जिल्हा बँक तुमच्या सोबत राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सभागृहाचे काम विनामोबदला करून दिल्याबद्दल अभियंता राजाराम उर्फ बाळू सावंत यांचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सभागृहाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक रवींद्र मडगावकर , प्रमोद कामत, सरपंच प्रियंका नाईक , चेअरमन घनश्याम बांदेकर, श्री अळवणी यांनी उपस्थितना मार्गदर्शन केले.
