मालवणात आज अचानक पाणी गायब

नागरिक, होम स्टे धारकांची झाली गैरसोय

मालवण दि प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेमार्फत धामापूर नळपाणी योजनेद्वारे मालवणात होणारा पाणीपुरवठा सध्या एक दिवस आड होत असताना आज अचानक हा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पाणी पुरवठा बंद ठेवण्याबाबत नगरपालिकेने कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने आयत्या वेळी पाणी साठा संपल्याने नागरिक तसेच होमस्टे धारकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली.

मालवण नगरपालिकेद्वारे सध्या शहरात होणारा पाणीपुरवठा एक दिवस आड होत आहे. मात्र काही ठिकाणी यामध्ये नियमितता दिसून येत नाही. तसेच या नळपाणी योजनेतील धामापूर तलावातून पाणी सक्शन करणाऱ्या दोन पंपापैकी एक पंप बंद पडला असल्याने पाणी पुरवठ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात आज काही ठिकाणी अचानक पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप झाला. याविषयी कोणतीही पूर्वकल्पना नगरपालिकेकडून दिली गेली नाही. यामुळे नागरिकांकडील पाणी साठा संपल्याने तसेच पूर्व कल्पना नसल्याने पाणी साठ्याची इतर कोणतीही व्यवस्था करून ठेऊ न शकल्याने नागरिकांची धांदल उडाली. नागरिकांनी पाण्यासाठी इतरत्र धावधाव करून पाणी मिळविले. तर काही नागरिक होम स्टे धारक असल्याने पाणी संपल्याने पर्यटकांची पाण्याची गरज भागवताना त्यांच्या नाकी नऊ आले. सागरी पर्यटन बंद झाले असले तरी सध्या मालवणात पर्यटकांचा राबता असल्याने होमस्टे व हॉटेलवर थांबलेल्या पर्यटकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काहींनी पाण्याच्या टँकरलाही पाचारण केले. नगरपालिकेच्या या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

You cannot copy content of this page