दांडी येथील चर्चासत्रात घेतला निर्णय
मालवण (प्रतिनिधी)
मासेमारी व्यवसाय हा आमचा पिढीजात व शाश्वत व्यवसाय असून त्यावरच उदरनिर्वाह सुरु आहे. या व्यवसायात सरकारने नीट लक्ष घातल्यास हा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल. गेल्या पंधरा वर्षात मासेमारीला पर्यटनाचीही जोड मिळाली आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीसाठी किनारपट्टीवरील मच्छीमारांना अन्यत्र स्थलांतरित होण्याची गरज नाही. त्यामुळे तसा प्रस्ताव शासन, प्रशासन आणि इतर यंत्रणांनी आमच्यासमोर ठेवू नये, अशी रोखठोक भूमिका दांडी येथे झालेल्या चर्चासत्रात मच्छिमारांनी मांडत समुदाय स्थलांतराचा मुद्दा मच्छीमारांनी एकमताने धुडकावून लावला.
जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यूएनडीपी आणि जीईएफ स्मॉल ग्रँट प्रोग्रॅमच्या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा उपक्रम हाती घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने दांडी आवार येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये मालवण तालुक्यातील मच्छीमार व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी यूएनडीपी प्रादेशिक समन्वयक आशा हडकर, मत्स्यविकास अधिकारी रवींद्र मालवणकर, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप सुर्वे, प्रा. डॉ. विक्रांत बेर्डे, प्रा. डॉ. योगेश कोळी, कृषी सहाय्यक सुनील कदम, रोहित सावंत, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्वीता करंगुटकर, परवाना अधिकारी मुरारी भालेकर, श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष जगदिश खराडे, मालवण मच्छीमार सहकारी संस्था अध्यक्ष विकी चोपडेकर, वायरी माजी सरपंच भाई ढोके, कोळंब माजी सरपंच सदानंद सारंग, मिथुन मालंडकर, प्रमोद खवणेकर, गंगाराम आडकर, भूषण जुवाटकर, पंकज मालंडकर, रवीकांत आगरे, सुनील धनावडे आदी उपस्थित होते.
यावेळी जागतिक हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने विविध २१ प्रश्नांवर स्थानिकांची मते आजमावण्यात आली. ज्यामध्ये स्थानिक पीक, भाजीपाला, फळे यात बदल झाला आहे का ? शेतीत कुठल्या प्रकारच्या खतांचा जास्त वापर होतो, बदललेल्या जीवनशैलीचा स्थानिकांच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
जागतिक हवामान बदलाचा परिणाम पश्चिम किनाऱ्यावर जाणवू लागला असला तरी हवामान बदलामुळे स्थानिक मच्छीमार समुदाय आपला मूळ व्यवसाय सोडून रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतरित होतील, अशी कोणतीही स्थिती नाही. मच्छिमारी व्यवसायात सरकारने नीट लक्ष दिलेले नाही. सागर संपत्तीचे जतन होण्यासाठी प्रथम बेसुमार, बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, तरच मच्छिमारी दीर्घकाळ टिकेल, असे यावेळी मच्छीमारांनी स्पष्ट केले.
आज मच्छिमार मच्छिमारी व्यवसायासोबत पर्यटन व्यवसायातही कार्यरत आहे. सागरी जैव विविधतेवर सागरी पर्यटन अवलंबून आहे, सागरी जैव विविधता नष्ट झाली, तर मासेमारी आणि पर्यटन हे दोन्ही व्यवसाय धोक्यात येऊ शकतात, याचे भान ठेवूनच वाटचाल केली जात आहे, असे मच्छिमारांनी स्पष्ट केले. मात्र, सरकार वन्यजीव जीव संरक्षण कायदा लावून सागरी जैवविविधता संवर्धनासाठी सागरी अभयारण्यासारखे प्रकल्प आणू पाहतेय. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळेच दांडी आवार येथील जागेत होऊ घातलेल्या सागरी जैव विविधता केंद्रास मच्छीमारांनी प्रखर विरोध केला होता. खरेतर स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या कलाने सागरी जैव विविधता संवर्धनाचे काम सरकारने हाती घेतले पाहिजे, अशी सूचनाही यावेळी मच्छीमारांनी मांडली.
