⚡मालवण ता.२५-:
मालवण तालुक्यातील राठीवडे गावठणवाडी येथेच रहिवासी तथा जिल्हा परिषदचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंबाजी सिताराम धुरी (93) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले ते राठिवडे दशक्रोशीत आबा गुरुजी या टोपण नावाने परिचित होते. त्यांनी नोकरीची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात करून रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावात सेवा बजावून सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेनंतर जिल्ह्यातही शिक्षकी सेवा बजावली होती. आपल्या मायभूमीत राठिवडे शाळा नंबर.1 येथे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. राठीवडे देवस्थान समिती स्थापन करून गावातील धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. राठीवडे गावात रेशन धान्य दुकान चालू करण्यातही त्यांचा मोठा पुढाकार होता. एकंदरच राठिवडे गावच्या विकासासाठी त्यांचे मोठे मोलाचे योगदान होते. शिक्षकी पेशाबरोबर धार्मिक तथा वारकरी सांप्रदायिक म्हणूनही ते परिचित होते. त्यांना हार्मोनियम व मृदुंग वादनाची मोठी आवड होती. गावच्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले आबा गुरुजी हे येथील गरीब गरजू विद्यार्थ्यांना आपल्याकडून शक्य तेवढी मदत करण्यात नेहमीच पुढे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, मुलगी, पुतणे, पुतण्या, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. मुंबई स्थित होमिओपॅथीक डॉ. राजेंद्र धुरी, सामाजिक कार्यकर्ते सिताराम धुरी, अनिल उर्फ शंकर धुरी यांचेचे वडील तर उबाठा शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी तथा समाजसेवक सुभाष धुरी यांचे ते काका होत. त्यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
