मोहन केळुसकर;कातळावर हापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भरघोस अनुदान द्यावे
⚡कणकवली ता.२०-: जागतिक स्तरावर ग्लोबल वार्मिंगचे भयानक दुष्परिणाम चराचर सृष्टी अनुभवत आहे. या परिस्थितीत कोकणासह देशात रिफायनरी सारखे प्रदुषणकारी प्रकल्प उभारणे चराचर सृष्टीला धोकादायक आहे. मानवी इतिहासात कोकणसारख्या प्रांतात असंख्य पुरातनकालीन मंदिरे,गड, किल्ले, कातळशिल्पे आहेत. “युनिस्को” च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत त्याचा समावेश आहे. अशा परिस्थितीत नाणार, बारसू परिसरात विनाशकारी रिफायनरी प्रकल्प उभारण्यात कोकणवासियांचा प्रचंड विरोध आहे, याचे भान सर्वं पक्षीय नेत्यांनी ठेवावे. त्यापेक्षा या कातळावर जग प्रसिद्ध हापूस आंबा लागवडीसाठी शेतकऱ्यांना भरघोस प्रोत्साहनापर अनुदान द्यावे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने कोविआची बैठक मुंबई-दादर येथील कार्यालयात झाली. त्यावेळी अध्यक्ष पदावरून केळुसकर बोलत होते. यावेळी पदाधिकारी एकनाथ दळवी, भाऊसाहेब परब, सूर्यकांत पावसकर, प्रकाश तावडे, मनोहर डोंगरे, रमाकांत जाधव, चंद्रकांत आम्रे, विलास गांगण, संतोष दळवी, गणपत चव्हाण, सुरेश गुडेकर आदी उपस्थित होते.
रशियासह अन्य देशांतून कच्चे क्रुड तेल आणायचे. त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळी उप उत्पादने निर्माण करायची. या प्रक्रियेत जमीन आणि समुद्र प्रदुषित करायचा. ग्लोबल वार्मिंगमध्ये भर घालायची. शेवटी ही उत्पादने निर्यात करायची. उत्पादक विदेशी कंपन्यांचे उखळ पांढरे करायचे ही निती देशाला घातक आहे, असे सांगून केळुसकर म्हणाले, आज कोकणातील कातळ माळावर तयार होणाऱ्या “हापूस” आंब्याला देश-विदेशांतील खवय्यांची सर्वाधिक पसंती आहे. त्यामुळे देशाच्या तिजोरीत भर पडत आहे. त्यामुळे रिफायनरी सारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणून कोकण भकास करू नये.
नाणार अथवा बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या घोषणेनंतर या भागातील भूमीपुत्रांच्या जमिनी राजकारण्यांशी संबंधित काळ्या धंद्यावाल्यांनी खरेदी करण्याचा सपाटा लावला. आज त्यांना वाचविण्यासाठी सत्ताधारी राजकारणी प्रकल्पाचे समर्थन करीत आहे, असा आरोप करुन ते म्हणाले, या कालावधीतील जमीन खरेदीची चौकशी केली पाहिजे. मुळ भुमिपुत्रांना या जमीनी पुन्हा हस्तांतरित केल्या पाहिजेत. तसेच या जमीनींवर हापूस आंबा लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भरघोस अनुदान देऊन आंबा बागा निर्माण करायला हव्यात.प्रास्ताविक दळवी यांनी तर मनोहर डोंगरे यांनी समारोप केला.
