सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा १ मे रोजी…

⚡सावंतवाडी ता.२८-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने संस्थेच्या बहुप्रतिक्षित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजता उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक कै. आबा उर्फ अनिल परुळेकर यांनी काही वर्षांपूर्वी पाहिलेलं रुग्णवाहिकेचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे.

“एक सेवाभावी उपक्रम” या माध्यमातून संस्थेने समाजातील दानशूर व्यक्ती, विविध सेवाभावी संस्था, सहकारी संस्था व क्रीडा मंडळांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारो हात मदतीसाठी पुढे सरसावले आणि उदारहस्ते आर्थिक सहाय्य दिले.
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, ही मदत केवळ आर्थिक नसून माणुसकीचा जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. या रुग्णवाहिकेमुळे गरजू रुग्ण तसेच अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार असून अनेक कुटुंबांसाठी ती आशेचा किरण ठरणार आहे.
या सेवाभावी उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती व नागरिकांनी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रो. सतीश लक्ष्मण बागवे यांनी केले आहे. तसेच भविष्यातही अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page